Jump to content

पान:मनू बाबा.djvu/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "बाबा, तुम्ही रामूच्या आईजवळ बोललेत का? रामूची आई किती मायाळू आहे! त्या दिवशी माझं जरा डोकं दुखत होतं, तर लगेच त्यांनी तेल चोळलं. किती तरी त्या माझं करतात."

 "साळूबाई खरंच थोर आहेत. त्यांनी मला कितीदा तरी धीर दिला आहे. तू लहानपणी कधी आजारी पडलीस, तर लगेच यायच्या. औषध उगाळून द्यायच्या. तुला त्यांनी न्हाऊमाखू घातलं आहे. तुझं सोनी नाव त्यांनीच सुचविलं. साळूबाईसारखी सासू मिळणं म्हणजे पूर्वपुण्याईच हवी. मी अद्याप त्यांच्याजवळ बोललो नाही, परंतु बोलेन साळूबाई नाही म्हणणार नाहीत. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. जसा रामू,तशी त्यांना तू. तू सर्वांना आवडतेस." मनू बाबांनी सोनीच्या केसांवरून हात फिरवीत म्हटले.

 झोपडीत अशी बोलणी चालली होती. तिकडे संपतराय व इंदुमती झोपडीकडे येण्यासाठी बाहेर पडत होती. घोड्याची गाडी तयार झाली. त्यात ती दोघे जण बसली. संपतरायाच्या हातात इंदूमतीचा हात होता. कोणी बोलत नव्हते. गाडी निघाली. रात्रीच्या वेळेस आवाज घुमत होता. कोणी कोणी घरातून डोकावून पाहत होते. "जात असतील फिरायला. घरात करमत नसेल. मुल ना बाळ!" असे कोणी म्हणत होते.

 झोपडीच्या दाराशी गाडी थांबली. सोनी व मनूबाबा चकित झाली कोणाची गाडी? रात्रीच्या वेळी कोण आले असेल? आपल्याकडे का कोणी आले आहे? कोणी प्रवासी आहे? इतक्यात दारावर टकटक आवाज झाला. सोनी पटकन उठली व दाराजवळ गेली. तिने "कोण आहे" म्हणून विचारले.

 "मी संपतराय" उत्तर आले.

 सोनीने लगबगीने दार उघडले. दारात संपतराय व इंदुमती उभी! म्हातारा मनूबाबा उठला. सोनीने पटकन बैठक घातली. एक आराम खुर्ची होती व दुसरी एक खुर्ची होती. त्या दोन्ही खुर्च्या पुढे करण्यात आल्या.

 "बसा" मनूबाबा आदराने म्हणाला.

 "तुम्हीही बसा. बस सोन्ये." संपतराय प्रेमाने म्हणाले.


५४ * मनूबाबा