पान:मनू बाबा.djvu/४९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सोनीचा नकार

सोनी व मनूबाबा प्रेमळपणे गोष्टी बोलत बसली होती. झोपडीत दिवा होता.

“बाबा, तुम्ही अंगावर घ्या ना ती शाल. आज बाहेर थंडी आहे. घालू तुमच्या अंगावर?” प्रेमाने सोनीने विचारले.

“तू ज्या दिवशी मला सापडलीस, त्या दिवशी याच्याहून अधिक थंडी होती आणि तू लहान असूनही उघड्यातून रांगत माझ्या झोपडीत आलीस. माझ्या लहान सोनीला थंडी बाधली नाही. मी तर मोठा आहे. आज थंडीही तितकी नाही, मला कशी बाधेल?” मनूबाबा म्हणाले.
“बाबा, आज सारं सोनं सापडलं. कल्पनाही नव्हती.”


“तुझ्या लग्नासाठी आले. रामूही गरीब आहे. तुला आता दोन दागिने करता येतील. तुला आवडतात की नाही दागिने ? ”
“मला आवडतात. आता आपली बाग लवकर तयार करायची. आमच्या लग्नाला आमच्या बागेतील फुलं. त्या फुलांना आईच्या श्वासोच्छ्वासाचा सुगंध येईल. आईचे आशीर्वाद त्या फुलांतून मिळतील. नाही बाबा?” तिने सद्गदित होऊन विचारले.
“होय बेटा. आईच्या आशीर्वादाहून थोर काय आहे? मरता मरता तिनं स्वतःचं लुगडं फाडून ते तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं होतं. जणू तिनं आपलं प्रेम तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं. आई मेली. परंतु तिचं प्रेम मागं राहिलं प्रेम अमर आहे. त्या प्रेमाची स्मृतीही आपलं पोषण करीत असते. त्या प्रेमाच्या स्मृतीनं उत्साह येतो, सामर्थ्य येतं. आपणास निराधार असं वाटत नाही.” मनूबाबा बोलत होते.