पान:मनू बाबा.djvu/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


धैर्य मला झालं नाही. इंदू, असा मी आहे. तुझ्यापासून पंधरा वर्षे सत्य लपवून ठेवलं. परंतु आज सांगत आहे, या पापी पतीला क्षमा कर. तुझ्या प्रेमात आहे का इतकी शक्ती, इंदू!" असे म्हणून त्याने डोके वाकविले.

इंदू थरथरत होती. हमीगत ऐकताच, क्षणोक्षणी तिची मुद्रा बदलत होती. परंतु शेवटी तिच्या डोळ्यांतून करूणा चमकली. तिने पतीच्या मस्तकावरून हात फिरविला. दोघे पुन्हा शांत बसली कोण बोलेना.

"इंदू, तू माझ्याकडे प्रेमानं अतःपर पाहू शकशील का? माझा तिरस्कार नाही ना करणार? तुझं प्रेम थोर आहे. तू मला पदरात घे. घेशील?" संपतरायाने एखद्या मुलाप्रमाणे विचारले.

"तुम्ही इतक्या वर्षानी का होईना, परंतु मजजवळ सत्य सांगितलंत हा तुमचा मोठेपणाच आहे. नाही ही गोष्ट मला थोडीच कळली असती? असो. झालं ते झालं. तुम्ही व मी आता अलग नाही. पंधरा वर्षे एकत्र राहिलो. तुम्हांला कशी तुच्छ मानू? तुम्ही जणू माझे झाले आहांत. तुमचा तिरस्कार करणं मी माझाच तिरस्कार करण्यासारखं आहे. जाऊ दे; जगात निर्दोष कोण आहे? पापाचा पश्चाताप झाला म्हणजे पुरे. परंतु हे जर मला पूर्वीच सांगितलं असतं तर ती सोनी मी आपल्या घरी आणली असती. आपण तिला वाढविलं असतं. आपण तिचं कोडकौतुक केलं असतं. आपल्या घरात तिनं आनंद पसरवला असता. देवानं आपणांस मूलबाळ दिलं नाही. ते सुख आपणांस नाही. ती उणीव भरून निघाली असती, मी तिला कुशीत घेतलं असतं. तिला जेवू घातलं असतं. तिला न्हाऊमाखू घातलं असतं. मातृसुखाचा आनंद मी लुटला असता, परंतु आता काय? असो. आपलं नशीब." असे म्हणून इंदू थांबली.

"आपण मनूबाबाकडे जाऊ व सारं सांगू, सोनीला घेऊन येऊ. ती येईल. तिला सांगितलं की ती येईल." संपतराय म्हणाला. "जाऊ त्यांच्याकडे." ती म्हणाली. "आज रात्रीच जाऊ." तो म्हणाला.