पान:मनतरंग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या तालुक्याच्या गावचा प्रसंग. गोपाळ गणेश आगरकरांच्या सामाजिक परिषदेच्या शताब्दीच्या वेळचा. एका पुरोगामी गृहस्थाकडे आम्हांला संध्याकाळी चहाला बोलावले. आम्हांला म्हणजे कुशाक्कांना, त्यांच्या बरोबर आम्ही. कुशाक्कांनी स्वातंत्र्य संग्रामात दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. गृहस्थांच्या सुनेने सुरेख पोहे केले होते. गप्पांच्या रंगात पोह्यांची चव अधिक खमंग झाली. निघताना या पुरोगामी गृहस्थांनी सुनेला आठवण दिली, 'अगं, कुंकू लावलंस का ?'
 तिने मला, सुनीताला कुंकू लावले. आणि ती कुंकवाचे बोट कुशाक्कांच्या कुंकू लावलेल्या प्रसन्न कपाळावर टेकवणार इतक्यात सासरेबुवाच्या तोंडून जमिनीतून धार उसळून यावी तसे शब्द बाहेर आले 'अगंऽऽअगंऽऽ'. ती सून बिचारी दचकून थबकली. कुशाक्कांच्या गळ्यातले मंगळसूत्र, माथ्यावरचे कुंकू, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अक्षरश: कोमेजून गेले. कुशाक्कांचे सतत कामगारांसाठी लढणारे पती, अप्पा गेल्या वर्षीच अचानक गेले होते. मृत्यू म्हणजे जीवनाची एक अपरिहार्य नैसर्गिक अवस्था हे मानणाऱ्या कुशाक्कांनी पतीच्या मृत्यूचा सहजपणे स्वीकार केला होता.
 "वयाच्या विसाव्या वर्षी मी मंगळसूत्र स्वीकारले होते. ते आता माझे लेणे आहे. तो माझा दागिना, माझे सौभाग्य आहे. ते माझ्या सोबतच येणार." अशी भूमिका घेऊन कुशाक्काने नवी वाट चोखाळली होती आणि आज पायात काटा रुतला तोही आपल्या माणसाने पेरलेला !!
 सुभग दिसणे, प्रसन्न राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष. हा अधिकार कुणाच्या असण्या-नसण्याशी का जोडायचा? जेव्हा एखादी व्यक्ती वा वस्तू एखाद्याच्या मालकीची होते, तेव्हाच त्याच्या असण्या-नसण्याचे अधिकार त्याच्या मालकीच्या व्यक्तीचे होतात. कालप्रवाहाच्या ओघात असे घडले असावे आणि त्यातून सतीप्रथा, केशवपन, एका लाल लुगड्यात बाईला लपेटणे, ती अशुभ मानणे वगैरे आले असावे. शिक्षणातून समोरचे क्षितिज उजळत जाते. तसे घडले आणि मग राजा राममोहन राय, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी रांग क्षितिजाला उजळत गेली. ही झाली काही इतिहासाने नोंदवलेली नावे. पण आज उजळती रांग एकेरी न राहता समृद्ध... विशाल होत चालली आहे.
 बारा तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट. राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी तीस बत्तीस युवकयुवतींचा जत्था घेऊन मी अन्नामलाई विद्यापीठात गेले होते. मधुरिकाही त्यात होती.

मनतरंग / ८४