पान:मनतरंग.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्यायला लावीत. तसे ते भाविकच. अरविंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, विनोबाजी यांचे विचार त्यांना विशेष भावत. त्या शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या मनात काही भूमिका गोंदवली.
 ... मनोरमा, आपण मरतो म्हणजे इथले अस्तित्व संपते. देवाला प्रिय होतो. आपल्याला निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना शरीराचे वेगळेपण दिले तरी दोघेही माणूसच. दोघांचे मन सारखे. भावना, संवेदना, इच्छा, आकांक्षा... सारे सारखे. दोघांनाही निसर्गाने बुद्धी दिली आहे. दोघांच्या व्याधी सारख्याच. दोघेही चुका करणार, त्या दुरुस्त करणार. सुखाचा, निवांत शांतीचा शोध घेणार. माणसे माणसाशिवाय जगूच शकत नाहीत. साथसंगत हवी, आधार हवा.
 गेली तीस वर्षे मला पत्नी म्हणून पदोपदी साथ दिलीस. माझे घर शाकारलेस... फुलवलेस आणि आता मला आधी बोलवणे आलेय. एक आग्रही विनंती...शेवटचा हट्ट मी करणार आहे, पुरवशील ना? मी गेल्यावर सौभाग्यालंकार उतरावयाचे नाहीत; तुझी साग्रसंगीत तुळशीची पूजा, सण... व्रते सारे साजरे करायचे. अगं, शेवटी आपण परमेश्वराजवळ जाणार ना? मग अशुभ होऊन का जायचे ? सौभाग्य हे केवळ पतीशी जोडलेले नसते. ते आपल्याशी, आपल्या विचारांशी... आपल्या वर्तनाशी... आपल्या राहणीशी जोडलेले असते. तुझ्या स्वरातील गीता ऐकता ऐकता शेवटचा श्वास घ्यायचाय मला...
 करशील ना माझा हट्ट पूर्ण ?
 ...आणि ताई वकीलसाहेबांचा हट्ट अत्यंत आत्मीयतेने पुरवीत आहेत. इतकेच नाही तर स्वीकारलेला वसा, न उतता न मातता, या प्रसंगाला सामोऱ्या जाणाऱ्या इतर भगिनींनाही देत आहेत. त्यांच्या प्रसन्न हसण्याला कदाचित करुणेची किनार असेलही. पण त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक निरामय... प्रशांत वाटतो. एरवी कशा दिसल्या असत्या त्या ? कोरा चेहरा, डोळ्यातून टपटपणारे कारुण्य, रुखेफिके कपडे, अवतीभवती एक किर्र उदासी. पण आज ताई, त्यांची मुले, सुना, लेक, जावई, नातवंड.. अवघे घर प्रसन्नपणे उभे आहे.
 ...ताईंना वकीलसाहेबांची आठवण येतच असेल. कधीकधी आठवणींनी डोळे भरून येत असतील, मन कशातच लागत नसेल. पण हे सारे व्यक्तिगत, आतल्या आत. त्यामुळे परिसरावर अशुभाची सावली नाही. काही माणसे इतक्या सहजपणे परिवर्तनाची लय पकडून पुढे जातात. अशा वेळी आठवतो

सुभगा...सुखदा ! / ८३