पान:मनतरंग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांचे वय. विलक्षण गोड तरीही धारदार आवाज. ऐकणाऱ्याला भारून टाकणारा, समूहगीत, सुगमसंगीत, समूहनृत्याला पार्श्वगायन यांची मुख्य जबाबदारी तिच्यावर होती. महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने केली जाणार होती. आमच्या गटाने भारतीय पोषाखातील विविधता सजवायचे ठरवले.

"युग की जडता के खिलाफ एक इन्किलाब है
हिंद के जवानों का इक सुनहेरा ख्वाब है
भारतीय सांस्कृतिक क्रांती, मानवीय सांस्कृतिक क्रांती ॥"

 हे गीत ढोलकी... पेटीवर गात गटागटाने जायचे होते. मुलींना मी सजवीत होते. इतक्यात मधुरिका काहीशा अस्वस्थपणे माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती. "ताई मी बंगकन्या होतेय. भांगात सिंदूर कशी भरू मी? माझे मिस्टर लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात ब्रेन ट्यूमरने गेले..." तिचा स्वर जड झाला होता.
 "आण, मी भरते तुझ्या भागात सिंदूर... लग्नानंतर चार महिन्यात नवऱ्याला ब्रेन ट्यूमर होणे हा तुझा का दोष आहे ? आणि काही पापबीपच लागणार असेल ना, तर ते मला लागेल. तुला नाही." तिच्या भागात सिंदूर भरीत मी बोलले. बंद कडी उघडावी तसे मधुरिकाला झाले असावे. नंतरच्या चारपाच दिवसात खळाळणारी, वादावादी करणारी, स्कर्ट...पंजाबी ड्रेस घालून लालचुटूक टिकली कपाळावर रेखून मुक्तपणे वावरणारी मधुरिका. अन्नमलाईहून परतताना हैदराबाद - मनमाड रेल्वेत आम्ही सर्वजण. औरंगाबाद यायला थोडा वेळ उरलेला. जो तो आवराआवरी करणारा. मधुरिका कुठे दिसेना. खरे तर ती समोरच होती... अंगभर नेसलेली फिकट राखाडी रंगाची साडी. कपाळावर टेकलेली बारीकशी काळी टिकली. दिसेल न दिसेल अशी. माझ्या डोळ्यांतले प्रश्नचिन्ह तिने वाचले असावे.
 "बाई, एक लक्ष्मणरेषा तुमच्या आधाराने ओलांडली मी. खूप काही हाती आलं. नवं बळ मिळालं. माझी खात्री आहे की मी आज ना उद्या नवी दिशा शोधीन. जिथे समाधान असेल आणि मी सुभगा असेन... सुखदा असेन."

■ ■ ■

सुभगा...सुखदा ! / ८५