पान:मनतरंग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 मी घरच्या फाटकातून आत शिरले. तुळशी वृंदावनासमोर त्या उभ्या होत्या. हात जोडलेले. चेहऱ्यावर निरामय शांती. डोळे मिटलेले. वृंदावनातले निरांजन तेवणारे, कपाळावर हळदीकुंकवाची नुकतीच रेखलेली बोटं. उदबत्तीचा मंद गंध आणि भवताली दवात न्हालेली ताजी सकाळ. त्यांनी डोळे उघडले नि माझ्याकडे पाहून मंदपणे हसल्या. सकाळचा प्राजक्ती गंध मला वेढून गेला.
 "किती दिवसांनी आलात ! आलात की येत जा ना. तुम्ही भेटलात की मनाला खूप बरं वाटतं." त्या बोलल्या आणि माझेच मन... डोळे आतल्या आत भरून आले.
 तीन वर्षांपूर्वी वकीलसाहेब हे जग सोडून गेले. जाण्यापूर्वी सहा महिने त्यांना रक्ताचा कॅन्सर झालाय हे लक्षात आले होते. असे काही निदान झाले की भवतालच्या, जवळच्या माणसांच्या मनाची आतल्या आत तयारी होत असते. तरीही ती व्यक्ती नसण्याची कल्पना सुद्धा मन पिळवटून टाकणारी असते. त्यातून तीस-बत्तीस वर्षे जिने समर्पित भावनेने साथ दिली, तिच्या मनाची थरथर कशी सांगावी ?
 निदान झाल्यापासून वकीलसाहेब ताईंशी सतत बोलत. नवनवीन विचार सांगत. त्यांनी खूप वाचावे म्हणून आग्रह धरीत. मुलांना पुस्तके आणून आईला

मनतरंग / ८२