पान:मनतरंग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणाऱ्या बाईला रात्री उठवून, तिला वेठीस धरून त्यांनी तो पुरवलासुद्धा !!
 एका विशिष्ट उच्चभ्रू वर्गातील स्त्री-पुरुष रात्री गप्पा मारीत, पत्ते खेळत, खास पेयाचे घुटके घेत, दिवसभराचा बौद्धिक... शारीरिक ताण घालवतात. आणि त्यांच्या गप्पा, त्यांचे सैल विनोद अधमुऱ्या वयाच्या मुलांच्या कानांवर पडतात. डोळ्यात झोप असते, कुशीत घ्यायला आई नसते... डोक्यावरून हात फिरवीत गमतीजमतीच्या गोष्टी सांगायला जवळ बाबा नसतात. अशावेळी कान असतात आई-बाबांच्या गप्पांकडे. बंद खोलीच्या फटीतून दिसणारा पलीकडचा रंगलेला खेळ. अशावेळी मुलांचे एकटेपण त्यांना अधिक बोचू लागते.
 माझी एक मैत्रीण तक्रार करीत असे. ती जे सांगेल त्याच्या नेमके उलट तिची मुलगी वागे. मुलगी वाढत्या वयातली. आणि ही दिवसभर कामावर. तिला काम करताना धस्स होई. वाटे, मुलीला काही अडचण तर नसेल ना आली? तिला कोणी फसवणार तर नाही ना ? खरं तर, एका विशिष्ट वयात आई लेकीची अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिण असायला हवी. तसा खास प्रयत्न आईकडूनच व्हायला हवा. आणि तोही लेकीला जाणवणार नाही अशा सहजपणे. त्या अधमुऱ्या वयात मुलांना शरीराबद्दल, बाहेरच्या जगाबद्दल तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न पडत असतात. अशावेळी हळुवारपणे उत्तरे देणारी, निसर्गाच्या रीती समजावून सांगणारी, आत्मविश्वासाने जवळ घेणारी आई 'मैत्रीण' म्हणून हवी असते. तर मुलांना बाबा 'मित्र' म्हणूनच हवे असतात.
 'प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत् ।' असे पूर्वीपासून म्हटले आहे. पण 'फास्टफूड'च्या काळात हे सगळेच हरवून चालले आहे.
 वयाच्या पाचव्या वर्षी रात्री दीड वाजता पुरणपोळीचा हट्ट पुरा केला जातो. मग वयाच्या विशीत कुणाला अमृता तर कुणाला शबाना हवी असते. इथे हट्ट घरापुरता मर्यादित राहात नाही. दिसेल ते माझेच. आणि माझे झाले नाही तर हातात कायदा ; शस्त्र घेण्याचा उद्दामपणा! तऱ्हेतऱ्हेची व्यसने, सवयी आधीच जडलेल्या.आणि हे सारे आईवडिलांच्या लक्षात येते तेव्हा प्रेमाचे... वात्सल्याचे, नीतीचे दोर कापून घरचे 'लेकरू' कड्याच्या दिशेने बेफाम धावत सुटलेले असते.
 आता कुटुंबासंबंधीच्या संकल्पना अधिक नेटक्या आणि नेमक्या करणे आवश्यक आहे. आज ज्योत्स्नाताई नाहीत. त्या म्हणत की, 'स्त्रीच्या जीवनात काही काळ 'हायबरनेशन'चा असतो. त्या काळात स्त्रीला कुटुंबात स्थिर राहावे

मनतरंग / ८०