पान:मनतरंग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आधी तिच्या खऱ्या मम्मीकडे नि 'त्या' डडीकडे जाणार होती. नंतर खऱ्या डॅडीकडे नि 'त्या' मम्मीकडे जाणार होती. एकूण तिची मज्जाच होती. कारण दोन-दोन ठिकाणी सुट्टी घालवायला मिळणार. शिवाय दोन - दोन भेटवस्तू... आणि ही मज्जा आमच्या मित्राच्या कन्येला मिळणार नव्हती. कारण खरी मम्मी नि खरे डॅडी एकाच घरात राहत होते.
 आमचा मित्र नेहमी सांगत असे. आपल्या कुटुंब संस्थेचे नेमकेपण; तिचा जीवनात मिळणारा आधार इकडे आल्यावर कळतो. पण ही बात वीस वर्षांपूर्वीची.
 आमची पिढी स्वातंत्र्योत्तर काळात, एकोणीसशे साठ नंतर तरुणाईत आली. प्रगतीची विविध क्षितिजे आमच्यासमोर रोजन् रोज उजळत होती. मध्यमवर्गातील स्त्रिया शिकू लागल्या होत्या. आपण स्वत: नोकरी वा व्यवसाय करून मिळणारा पैसा खर्च करताना आपण निर्णय घेऊ शकतो. आपले मत अधिकाराने मांडू शकतो आणि त्या मताला घरातील वडीलधारी माणसे किंमत देतात याचा सुखद अनुभव त्यांना येऊ लागला होता. दिवसेंदिवस गरजा वाढत होत्या. पैसा मोकळेपणाने येऊ लागला की गरजा वाढतातच. पण विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांच्या चौकटी मात्र परंपरागत राहिल्या, त्यात फारसे बदल झाले नाहीत. पूर्वी घरात संपूर्ण तनमन केंद्रित करणाऱ्या बाईला आज अर्थार्जनासाठी आठ दहा तास घराबाहेर गुंतावे लागते. पण घरातल्या जबाबदाऱ्या... विशेषतः मातृत्व आणि मुलांचे संगोपन ह्या नैसर्गिक जबाबदाऱ्या यांतून तिला मुक्ती नसते. या धावपळीत खूपदा मुलांना 'अगदी हवीच' असलेली आई सापडत नाही; कुटुंबाच्या अवकाशात मुले एकटी, एकाकी होतात. पूर्वी आजोबा-आजी घरात असत. त्यांच्याशी मुलांची दोस्ती असे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही संस्थाही मिटत चालली आहे. पालकांना मुलांशी संवाद साधायला वेळ नाही. मग जो थोडाफार वेळ मिळेल, त्यात मुलांवर वस्तू... खाऊ यांची उधळण करून त्यांचे नको ते हट्ट पुरवून आपल्या प्रेमाची, जवळिकतेची जाहिरात मुलांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न पालक करतात. पण त्यातून त्यांच्या मनातले उदास रिकामेपण भरून निघेल का ?
 एक आजी कौतुकाने सांगत होत्या की, आईपासून दूर त्याच्याकडे राहणाऱ्या नातवाने रात्री एक वाजता पुरण पोळीचा हट्ट धरला आणि स्वयंपाक

कदाचित् हे तुम्हाला पटणार नाही / ७९