पान:मनतरंग.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 तो गेल्यावेळी भेटला तेव्हाच त्याच्या डोळ्यात अखेरच्या प्रवासाची चमक जाणवली होती. समोर बघण्याचेही तो टाळत होता. नजरेत हताश असहायता, पुढ्यातल्या काळोखाची पापण्यांवर गर्द सावली. त्याला पाहून जीव आतल्या आत गलबलला. अत्यंत सधन, उच्चशिक्षित आईवडिलांचा... उच्चशिक्षित कुटुंबातला, सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या घरातला हा एकुलता एक मुलगा. पस्तिशी ओलांडायच्या आत याला मृत्यूच्या कड्यावर कोणी आणून उभे केले ?
 विविध व्यसने, प्रचंड उद्दाम स्वभाव, पैशाची चढेली हे दोष त्याच्यात कसे निर्माण झाले ? का निर्माण झाले ? कुणी निर्माण केले ? भवतालच्या परिसरातील सामाजिक बदलामुळे ? हा मला माहीत असलेला एक. पण असे अनेक आणि असंख्य केवळ भारतात नाही तर जगभर...
 आमचा एक मित्र पस्तीस वर्षापूर्वी कॅनडात जाऊन स्थायिक झालाय. त्याने वीस वर्षांपूर्वी सांगितलेला अनुभव. त्याची कन्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये... छात्रालय असलेल्या शाळेत होती. तिने तिची अडचण आपल्या बाबांना लिहून कळवली होती. तिच्या मैत्रिणीला दोन डॅडी होते आणि दोन मम्मी होत्या. ती

मनतरंग / ७८