पान:मनतरंग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगळेपण, स्वयंभूअस्तित्व विचार करण्याच्या बळावर सिद्ध केले. यमाने यमीच्या इच्छेचा स्वीकार केला नाही. यमी अत्यंत दु:खी झाली. यमाने तिला विरह सहन व्हावा म्हणून दिवस आणि रात्र निर्माण केली. आजही भाऊबीजेचा दिवस- कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस-यमद्वितीया म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात भाऊबीज अत्यंत महत्त्वाची. भाऊ-बहीण यांच्यातील रक्ताच्या नात्याला भावनेचा, संवेदनेचा रेशमी धागा जोडला गेला.
 रक्ताच्या नात्याइतकेच भावनिक नातेही अत्यंत बळकट असते. आधार देणारे असते. याची साक्ष राखीपौर्णिमा... रक्षाबंधनाचा सण देतो. या सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रवासात नातीगोती निर्माण झाली. कुटुंबसंस्थेचा आधार बनली. मानवी बुद्धीच्या विविध पैलूंपैकी एक पैलू म्हणजे 'संवेदना' संवेदनेच्या बळावर कुटुंबसंस्था अर्थपूर्ण, नियमबद्ध आणि बळकट झाली.
 नाती रक्ताची असतात तशी धर्माची असतात. रक्ताची नाती भाऊबहीण, मुलगा-मुलगी, काका, मामा, आत्या, मावशी, सासू-सासरे, दीर-नणंद वगैरे सर्वच पती-पत्नी या धर्मसंबंधावर वा सामाजिक संबंधावर आधारित दैहिक बंधाशी जोडलेली असतात आणि या नात्याचा पाया केवळ देह नसतो तर देहात सळसळणारी संवेदना, भावना असते. हे नाते धर्माचे असले तरी ते इतके जवळचे, मनस्वी असते की त्याच्या बळकटीवर, चैतन्यावर इतर नात्यांचे जिवंतपण अवलंबून असते. पती-पत्नींच्या एकरूपतेचे वर्णन करताना कवी कालिदास लिहितो,

"वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ ॥"

 वाणी आणि अर्थ यांची जशी एकरूपता तशीच पार्वती-परमेश्वराची एकरूपता. त्यांना वेगळे कसे करावे ? पती-पत्नी या नात्याची एकरूपता अशी असेल तर...? तर असा हा प्रवास नात्यागोत्याचा...भारतीय संस्कृतीच्या आगळेपणाचा.

■ ■ ■

प्रवास, नात्यागोत्याचा.../७७