पान:मनतरंग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगाने पळू शकत नाही, ना त्याचे दात वा जबडा समोरच्या संकटाचा घास घेऊ शकणारे, मात्र माणसाला निसर्गाने दोन शक्ती अशा दिल्या आहेत की, त्यांच्या बळावर तो अवघ्या विश्वावर, निसर्गावर वर्चस्व गाजविणारा शक्तिमान होऊ शकतो. पहिली शक्ती म्हणजे विचार करण्याची, घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची जिषा, बुद्धिमत्ता आणि तो विचार वाचेद्वारे प्रकट करण्यासाठी लाभलेले आगळेवेगळे स्वरयंत्र. ज्याच्याद्वारे त्याने भाषा तयार केली आणि स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग निर्माण केला. काळाच्या प्रवाहात गरजेनुरूप माणसाला स्वत:च्या या शक्तींचा शोध लागला.
 आदी काळात माणूस इतर प्राणिमात्रांप्रमाणे समोर येईल ते खात होता. गुहा, झाडांच्या कोटरात राहात होता. इतर प्राणिमात्रांत आई आणि नवजातप्राणी यांच्यात विशिष्टकाळच माताबालकाचे नाते असते. पिल्लू वयात आल्यावर जिने जन्म दिला त्या मातेशी ही कधी मादी म्हणून रत होते. त्यांना पिल्ले होतात. ही अवस्था एकेकाळी मानवी जीवनातही होती. याची साक्ष इडिपसची कथा देते. जन्म देणारी स्त्री राणी ही संपत्तीची, राज्याची मालकीण आहे. राजाचा मृत्यू झाला आणि राणी वृद्ध नसेल तर विशिष्ट पणावर तिचा विवाह त्या पुरुषाशी लावला जाई. इडिपस आणि त्याची पत्नी यांच्या नवजात बालकाचे भविष्य भयानक होते. आई आणि पुत्र यांना संतती होण्याचा योग त्यात होता. हे विधिलिखित टाळण्यासाठी नवजात बालकास ठार मारण्याचा आदेश सेवकांना दिला. परंतु मानवी मनातल्या संवेदनेने त्यांना तसे करू दिले नाही. अठरा वर्षानंतर राजा मरण पावला. हत्ती ज्याला हार घालील त्याच्याशी राणीचा विवाह करण्याचा 'पण' जनसमूहाने ठरवला. ज्याच्या गळ्यात हार घातला तो युवक राणीचाच मारण्यास दिलेला पुत्र होता. त्यांना मुले झाली. योगायोगाने हे सत्य लक्षात आले. हा आघात सहन न झाल्याने आई, मुलगा-पत्नी...पती यांनी आत्मघात करून घेतला. मुलांना आपली आई तीच आपली आजी आपला बाप तोच आपला भाऊ...हे नात्याचे सत्य उद्ध्वस्त करून गेले. त्यांनीही स्वत:चे डोळे फोडून हे सत्य नाकारून, विजनाकडे पाय वळवले. नात्याचा सांस्कृतिक प्रवास उजेडाच्या दिशेने सुरू झाला.
 अशीच प्रतिकात्मक कथा यम आणि यमीची आहे. एकेकाळी सख्या बहीणभावाचा विवाह निषिद्ध नव्हता. बौद्ध रामायणात राम-सीता हे बहीणभाऊ असल्याचा उल्लेख आहे. यमाने हा विवाह निषिद्ध ठरवला. मानवाने स्वत:चे

मनतरंग / ७६