पान:मनतरंग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 "अमन, जंबोआपला काका नाही. तो मामा आहे. त्याला मामा म्हण."
  "का? मी चाचूच म्हणणारेय त्याला जा...जा...!'
 'अरे तो अतुलमामाचा मित्र आहे. आईच्या भावाचा मित्र. म्हणजे मामाच नि बाबांचा मित्र म्हणजे काका, हो की नाही ग आजी ?' अनुष्का वय वर्षे चार आणि अमन वय वर्षे तीन. यांच्यातला हा संवाद.
 मुले वाढायला लागली की कुटुंबातल्या व्यक्तींच्या वागण्याबोलण्यातून, दैनंदिन व्यवहारातून, नातीगोती आपोआप शिकू लागतात. नाती गोती, गणगोत हे शब्द महाराष्ट्राच्या लोकजीवनात ओतप्रोत मुरले आहेत. गोत हा शब्द गोत्र या संस्कृत शब्दापासून मराठीत आला. भारतात सुरुवातीस 'गणराज्य' म्हणजे लोकांचे राज्य होते. एका विचाराने, एकदिलाने आणि एकमेकांच्या व्यथावेदना जाणून सुखाच्या दिशेने जाणारा जनसमूह म्हणजे 'गण'. शब्दांच्या मागे हजारो वर्षांचा इतिहास असतो. सामाजिक वाटचालीचे चलच्चित्र त्यात रेखाटलेले असते.
 माणूस हा एक प्राणीच. कुत्रे, मांजर, वानर, सिंह यांसारखा. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत:ची जीवनवृत्ती चालविण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी विशिष्ट शक्ती दिली आहे. वेगळेपण दिले आहे. माणूस हरणाच्या वा वाघाच्या

प्रवास, नात्यागोत्याचा.../७५