पान:मनतरंग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोंदण खळीत... हौदात पडलेल्या चांदोबासारखे दिसे. त्यांनी सांगितले की तापी नदीवर भलामोठा पूल बांधत आहेत. नदीवरचा पूल पक्का, कधीच न कोसळणारा व्हावा म्हणून लहान मुलांना त्यात चिणतात अशी लोकांची समजूत आहे आणि अशी टोळी धुळ्यात हिंडतेय अशी अफवा आहे. तुमच्या आई-बाबांना माहीत आहे की चंदनबाई घरपोच बाळं आणून सोडील. म्हणून आले नाहीत ते. आम्हांला त्यांनी घरी पोचवले त्यास आज पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. आपले मन विज्ञानाची जादू जाणू लागले आहे. पूल बांधण्याबद्दलचे गूढ कमी झाले आहे. मनातल्या अंधश्रद्धा कमी झाल्या तरी 'मंत्रीश्रद्धा' मात्र दिवसागणिक वाढत वाढत चालल्या आहेत. त्यातून निवडणुका जवळ आल्या की पाहायचे काम नाही !
 आपल्या एकूणच जीवनात राजकारण अगदी इथून तिथून आणि नको तितके झिरपले आहे. चहाची टपरी असो वा केस कापायचे दुकान असो, त्यांच्या उद्घाटनासाठी आम्हाला 'नेता'च लागतो. नेत्यांनाही गरज असते, मागे येणाऱ्या फौजेची. नेत्यांची सेना दिवसेंदिवस वाढत चाललीय. ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यांत निवडून जाणारे, त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करणारे, सगळे नेतेच की ! पूर्वी उद्घाटनासाठी कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात धन्यता मानली जाई. आज साहित्यसंमेलनेच राजकारणाची सुपर माध्यमे बनत चालली आहेत. पण बा. भ. बोरकरांसारख्या कवीराजाला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून त्यांची कविता थोडीच थिटी आणि बेचव होणार आहे ?

सरीवर सरी आल्या गंss
जळात गोपी न्हाल्या गंss

 किंचित सानुनासिक स्वरात, मस्त लयीत झुलणाऱ्या काव्यातील शब्दांची धुंदी, काळाचे प्रवाह अंगावरून वाहत राहिले तरी ढिली थोडीच होणार आहे ?
 मध्यंतरी मुलींना सडकसख्याहरींकडून होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात पोलीस स्टेशनवर फोन करण्याचा प्रसंग आला. रस्त्यावर साध्या वेशातले पोलीस ठेवणे आवश्यक होते. पण केंद्रात पोलिसांची संख्या अपुरी होती. थोडेफार जे होते ते जवळच असलेल्या मंत्रीमहोदयांच्या गावी पाठवलेले. मंत्रीमहोदयांचा मुक्काम गावी असला की सगळा फौजफाटा तिथे जाई. त्यांच्या संरक्षणापुढे सामान्यांच्या रक्षणाची तमा कोणाला ?

न इति, न इति... नेता /७३