पान:मनतरंग.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अगदी महत्त्वाच्या रस्त्यावरचा मोठा पूल, बांधणी धडाक्याने झाली. पाहता पाहता पूल बांधून पूर्ण झाला. यंदाचा पाऊसही तडाखेबंद. थोडासा पाऊस आला तरी उंचावरून धावत येणाऱ्या खळाळ ओढ्यांनी तिचे पात्र दोहो अंगांनी भरून जाते. एरवी बार्शी लाईट रेल्वेसारखी धावणारी बोरीमाय, पूर आला की दख्खनराणीच्या कैफात फुफाटत... धडाडत धावू लागते आणि पूर्वीच्या ठेंगू पुलावरून पाणी धावू लागले की तेवीस किलोमीटरवरची अंबाजोगाई गाठण्यासाठी बहात्तर किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. या नदीवर मोठा पूल बांधला जातोय याची खुशी परिसरातील सर्वांनाच होती. तो वेगाने बांधलाही गेला पण...
 पूल बांधून झाला तरी रस्ता बंद. दोहोबाजूंनी दगडकाट्यांचे कुंपण लावलेले. मग पुन्हा बहात्तर किलोमीटरची परिक्रमा. चौकशी केल्यावर कळले की पुलाचे विधीपूर्वक, साग्रसंगीत उद्घाटन व्हायचेय. मंत्रीमहोदयांना सध्या वेळ नाही वगैरे.
 मी अगदी छोटी असेन तेव्हाची गोष्ट. पहिलीत होते मी. एक दिवस शाळा सुटण्याआधीच मुलांचे पालक शाळेत आले आणि मुलांना घरी घेऊन गेले. आम्ही दोनतीनजणच असे की ज्यांचे पालक आले नाहीत. चंदनबाईंना मी विचारले तेव्हा नेहमीसारख्या गालाला खळी पाडून हसल्या. गालावरचे हिरवे

मनतरंग / ७२