पान:मनतरंग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चहाचा धंदा खूप तेजीत चालतो. अशाच एका हॉटेलात सदा काम करतो. खूप चौकस आहे. चहा पितापिता गप्पा मारायची, प्रश्न विचारण्याची आपली सवय. बहिणी किती ? भाऊ किती ?? बहिणी शाळेत जातात का ? शेती आहे का ?.. असले ठरीव प्रश्न आपण विचारणार. आणि उत्तरही त्याच वाणाची मिळतात.
 बहिणी तीन किंवा चार किंवा सहा. बहिणी शाळेत न जाणाऱ्याच. शेत असले तरी काही गुंठे नाहीतर एखादा एकर. आई-बाप ब्रासवर खोदकाम करणारे. नाही तर सहसा उसाच्या कामासाठी सहा महिने भटकंती करणारे. साखर कारखान्याला किंवा गंगथडीला सुगीसाठी जाणारे.
 पण सदाची उत्तरे मात्र वेगळी होती. त्याचा ताजा आवाज, काहीतरी नवे शोधणारे डोळे, मनाला प्रसन्नता देणारे होते.
 "ताई, मोठ्या बहिणीचं लगीन मी लहान असताना झालं. तिला नांदवत नाही नवरा. आमच्या घरीच राहते ती. पण धाकटीला मात्र हट्टाने शाळेत घातलंय मी. आमचा बा तयारच नव्हता. मग मी सांगितलं की, आता नोकऱ्या, बँकेचं कर्ज फक्त बायांना मिळणार आहे. तवा तयार झाला. आता तिसरीत आहे ती. आमचे संजीव गुरुजी म्हणतात की बाया पण माणसंच आहेत. त्या काय गाई म्हशी नाहीत. त्या शिकल्या तर घर शिकतं. लेकरं शहाणी होतात. मग देशपण पुढे जातो. पोरींनी जलमल्यापासून भाकऱ्या न गवऱ्याच थापायच्या? त्यांना पण खेळावं वाटतं, नाचावं वाटतं, शिकावं वाटतं..."
 सदासारखे भाऊ मुलींना मिळाले तर?
 एरवी खेड्यातल्या, सर्वसामान्य घरातल्या, गरिबाच्या घरच्या लेकींचे जिणे कसे ?

"हे हात कोवळे, ओझ्याखाली दबले...
हे श्वास उद्याचे, फुलण्याआधी खुडले
माथ्यावरचे ऊन बाभळी, क्षणभर उतरून यावे...
हे झाड कुणाचे ? मातीचे की आभाळाचे ?
हे झाड उद्याचे !! पालवत्या पान फुलाचे...
हसण्यासाठी... फुलण्यासाठी
चार क्षणांचे, अंगण कधी मिळावे...?"

■ ■ ■

हे झाड कुणाचे ? मातीचे की आभाळाचे ?/७१