पान:मनतरंग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाची कला. ही चित्रकला वा शिल्पकलेच्याही आधीची आहे, असे मानले जाते. कोणत्याही धार्मिक वा मंगल कार्यात रांगोळी हवीच, संगीत, नृत्य, शिल्प, आदी कलांचा विकास धर्माच्या अनुबंधातून झाला. 'रंगावली' ही त्यातूनच बहरत गेली. ही कला केव्हा आणि कशी निर्माण झाली असेल ? निसर्गात जागोजागी जाणवणारी, रंगांची चित्रमयी किमया निरखताना बोटातून झरलेले गाणे म्हणजे रांगोळी ! निसर्ग आणि मन यांचे नाते व्यक्त करणारी सांकेतिक भाषाच ! आम्हां स्त्रियांना... भारतीय स्त्रियांना सौंदर्यासक्तीचे हे वरदान आईच्या गर्भातच मिळते.
 सौंदर्याचा साक्षात्कार, मांगल्याची सिद्धी ही भूमिका रांगोळी रेखाटण्यामागे असावी. भारतभर विविध प्रांतांतून, आपापल्या सांस्कृतिक वेगळेपणासह ही कला विकसित झाली आहे. बंगाल, आसामातील 'अल्पना' राजस्थानातले शेणाने सारवलेले सपोत अंगण अंगणात आणि घराच्या भिंती 'मांडणा'ने सजलेल्या. गुजरातेत 'साथिया', महाराष्ट्रात ठिपक्यांची भूमितीबद्ध रांगोळी, आंध्रात फुलांनी बहरलेली 'मुग्गू' तामिळनाडूतील 'कोलम' आणि कर्नाटकातील 'रंगोली' च्या वळणदार रेषांच्या जाळीत नजर अडकून जावी ! मध्य प्रदेशात 'चौकपूरना' म्हणतात. आमच्या गंगामावशी उर्फ मम्मी, साठीच्या पुढच्या. 'मला बी लिवायला शिकवा.' असा त्यांचा हट्ट होता. त्यांना पेन्सिल धरायला शिकवताना आमच्या मुली थकल्या पण मग मी त्यांना कानगोष्ट सांगितली नि काय आश्चर्य! एका तासात... रांगोळीच्या माध्यमातून मम्मी सही करायला शिकली.
 वात्सायनाच्या कामसूत्रात या कलेचा उल्लेख आहे. सरस्वती, कामदेव यांच्या पूजेसाठी फुलांच्या आकृती काढीत. ७ व्या शतकातील 'बरांग चरित्रात' पंचरंगीचूर्ण, धान्य, फुले यांच्या रांगोळ्यांचा उल्लेख आहे. १० व्या शतकातील 'नलचंपू' ग्रंथात उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळ्या काढीत असे लिहिले आहे. १२ व्या शतकातील 'देशीनाममाले' त हेमचंद्राने तांदळाच्या पिठाची रांगोळी काढल्याचे लिहिले आहे. 'मानसोल्लासात' कवी सोमेश्वर रांगोळीचा उल्लेख 'धूलिचित्र' असा करतो तर, श्रीकुमारने 'शिल्परत्ना' त 'क्षणिकचित्र' या नावाने उल्लेख केला आहे. जैन, पारशी धर्मांतही रांगोळी अशुभनिवारक मानली जाते.
 आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाच्या निमित्ताने तामिळनाडू, तेलंगण,

मनतरंग / ६६