पान:मनतरंग.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्नाटकात हिंडता आले. तिथे मात्र अजूनही घराचे अंगण रांगोळीने लखलखलेले असते. जणू अतिथींच्या स्वागतासाठी ओठांवर हासू गोंदवून उभे असते. म्हाताऱ्या आजीपासून ते थेट चार वर्षाच्या चिमुरडीपर्यंत सगळ्यांचे केस जुई नि अबोलीच्या गुंफणगजऱ्यांनी माळलेले !
 अंगण कुणाचेही असो, त्यावर रांगोळी रेखलेली असेच. रांगोळीला जाती भेदाची कुंपणे नव्हती. किंबहुना कलेला जाती-धर्माची बंधने आडवी येत नाहीत. आमच्या वर्गात ओल्गा डिसिल्वा होती. तिचे घर खिस्ती स्मशानाला खेटून होते. स्मशानाच्या कुंपणभिंतीला लगटून प्राजक्ताचे झाड नि कृष्णकमळीचा वेल होता. तिला रांगोळी एवढी आवडे की रोज तिचे अंगण रांगोळीने नटलेले असे. पण आम्ही मराठी माणसे, ही पारंपरिक लोककला विसरत तर चाललो नाही ना ? आता बघावे तर, अवतीभवतीच्या अंगणात रीत म्हणून चार फुल्या रेघाटलेल्या असतात. दसरा-दिवाळीला अंगणात दिमाखाने सजणारा गालिचाही आता विरळ होत चाललाय. माझी एक ज्येष्ठ मैत्रीण, स्त्रीवादी कार्यकर्ती, कर्नाटकात वाढली आहे. तिच्या घराचे अंगण तऱ्हेतऱ्हेच्या पारंपरिक रांगोळ्यांनी कायम फुलारलेले असते. तिच्या घरात शिरताना माझे डोळे प्रथम अंगणात स्थिरावतात. पांढऱ्याशुभ्र रेखीव वळणदार, नियमबद्ध रेषा. त्यावर लाल-पिवळे हळदकुंकवाचे नाजूक गोंदण.
 ...अंगण रेखायचे तर पहाटे उठणे आले. शिवाय घराला अंगण हवे. पूर्वी घराला अंगण असे, मागे पडवी असे. आता तालुक्याच्या गावापर्यंत 'ब्लॉक सिस्टीम' पोचलीय. घराचे रंगरूप बदलतेय. घर म्हटले की टी.व्ही. आला की जागरणे आलीच. मग उशिरा उठणे वगैरे, डोळ्यांचा वा नजरेचा उपयोग वाचनासाठी, काही आगळे वेगळे दिसले तर ते निरखण्यासाठी करणे, हे विझत चाललेय. रंग, शब्द, स्वर यांचे क्षणोक्षणी धिंगाणा घालणारे धसमुसळे रूप आणि अधूनमधून वाट्याला येणारे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे काही क्षण, हा टीव्हीचा बाज. त्यात जीवनातल्या सुंदर परंपरा हरवत चालल्या आहेत. खरे तर रांगोळीचे विविध प्रकार आम्ही दूरदर्शनवरून शिकू शकतो आणि शिकवू शकतो. विविध प्रांतांतले सांस्कृतिक वैशिष्ट्यांसोबतचे रांगोळीचे वेगळेपण सर्वांपर्यंत पोचवता येते. पण अशा कार्यक्रमाची आवड तरुण पिढीत उरलीय का? मुलांना 'बुगी बुगी सारखे कार्यक्रम 'देखणे' वाटतात कारण,

दूर... दूर गेलेले अंगण /६७