पान:मनतरंग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दारातले आभाळाला टेकलेले बुचाचे झाड पांढऱ्या फुलांनी बहरू लागले की ओळखावे 'आश्विन' उंबरठ्यावर उभाय ! खरे तर आश्विन महिना बारा महिन्यांचा राजाच. जाई, जुई, चमेली, कुंदा... या पांढऱ्या सुगंधी फुलांच्या वेली, कळ्या-फुलांनी वाकलेल्या असतात. गुलाबाची झुडपे नव्या कळीदार घुमाऱ्यांनी बहरत असतात. निरभ्र आभाळ, लखलखीत ऊन, तरारलेली राने, झुळझुळणारे झरे, पहाटे दवाची टपटप, गुलाबी थंडीचा शिडकावा आणि हवेत प्रसन्नतेची झळाळी.
 पहाटेच्या अर्धुक्या उजेडात अंगण झाडताना... सडा टाकताना अंगातून उत्साहाचा पूर ओसंडून जाई. आमचे घर आग्रारोडवर. त्यामुळे घराला ऐसपैस अंगण नव्हते. पण आहे तेवढे अंगण, शेणाचा सडा घालून, रांगोळीने आकंठ सजवण्यात वेगळा आंनद असे. उद्या कोणती रांगोळी काढायची, यावर डोक्यात काहूर असे... उषीच्या नाहीतर मंगलीच्या अंगणापेक्षा आमचेच अंगण किती नटलेले याची स्पर्धा अधिक. रांगोळीने सजलेले देखणे अंगण आज हरवत चालले आहे, दूर... दूर चालले आहे.
 रंगवल्ली... रंगबावरी वेल. चौसष्ट कलांत जिचा समावेश केला ती, एक

दूर... दूर गेलेले अंगण / ६५