पान:मनतरंग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "माँ, मला ना कुमारिका म्हणून गुप्ता काकूकडे बोलावलं होतं. आम्ही नऊजणी नि अमन, त्याला कौंगडा म्हणायच्या काकू. काकूनी आमची पूजा केली नि चक्क नमस्कार केला आम्हांला. माँ, मोठी माणसे लहानांच्या पाया नाही ना गं पडत ? दुधात शिजवलेला गोड भात खाल्ला. माँ, दोन वर्षाच्या निकिताने प्रसादाचा भात खाल्लाच नाही. माँ, कुमारिका म्हणजे काय गं ?' चार वर्षांची अवनी, काही नवे आणि आगळे पहिल्यागत मला उत्साहाने सांगत होती.
 तिचे गोंडस रूप, अतीव निरागस... अनघ दिसत होते. कपाळावर ओल्या कुंकवाचा टिका. त्यावर तांदळाचे दाणे... अक्षता चिकटलेल्या. हळदीचे बोट भिवयांच्या मध्यात टेकलेले. ओठ विड्याने लालचुटूक झालेले. मनगटावर चंदनाचा लेप. त्यावर हळदीकुंकवाच्या रेषा. पावलांवर लाल-पिवळे स्वस्तिक. चिंग्यावेण्यांवर गजरा माळलेला.आणि चंदनाने रेखलेली पावले. अंगात सुरेखसा हिरवा धारवाडी परकर. आणि त्यावर गुप्ताकाकुंनी दिलेली लालचुटुक रंगाची, चंदेरी झिळमिळ् किनार लावलेली चुन्नी.
 तिच्याकडे पाहतापाहता, माझे मन थेट पन्नास वर्षे मागे गेले. आपटे कांकूकडे बोडण असले की कुमारिका म्हणून माझी हजेरी असे. आणि आईचा

मनतरंग / ६२