पान:मनतरंग.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान सवाष्णीचा. खूप मज्जा यायची. आपण कोणीतरी आगळ्यावेगळ्या आहोत असे वाटे.पाहता पाहता मला 'कुमारिका' म्हणून बोलावणे येईनासे झाले. आईचा सवाष्णीचा मान मात्र कायम. मग मला खूप राग येई. वाईट वाटे माझ्या प्रश्नाचे उत्तर आईजवळ नव्हते. शेवटी तिनेच सवाष्ण म्हणून जेवायला जाणे सोडून दिले.
 माझ्यासमोर तेव्हा पडलेले प्रश्न माझ्या नातीलाही छेडणार का ? आज तर ती खूप खुशीत आहे; पण उद्या...परवा ?
 नवरात्रात तर कुमारिकेला विशेष महत्त्व. हस्त नक्षत्राचा हा काळ. खरिपाची पिके हाती येत असतात तर, रबीच्या पिकांची पेरणी सुरू असते. आश्विन महिन्याला उत्तरेत 'क्वारका महिना'... कौमार्याचा मास, असे म्हणतात. धनधान्य समृद्धीचा हा महिना. पावसात न्हालेली भूमी हिरवाईच्या... तरुणाईच्या उंबरठ्यावर उभी असते.

मंत्राक्षरमयीं लक्ष्मी मातृणाम् रूपधारिणीम् ।
नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यामावाह्याम्यहम् ॥

 नवरात्रात घट बसवताना, देवींचे असे गुणगान केले जाते. महिषासुराचा... दुष्ट, पापी प्रवृत्तींच्या पुतळ्याचा नाश करणे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जमले नाही. पण नवदुर्गेने मात्र स्वंयसिद्धपणे, आत्मविश्वासाने आणि निग्रहाने त्याचा नाग केला. प्रकृती वा आदिमाया या कुमारिका आहेत. त्यांच्यात अशी अद्भुत शक्ती आहे, जी दर महिन्याला कलंकांचा नाश करून तिला अधिक तेजस्वी करीत असते. पापींची नजर तिच्यावर गेली तरी ती अपवित्र होत नाही. भूमीप्रमाणेच स्त्री, स्वयंभूपणे शुद्ध, पवित्र, अतुलनीय, अनघा असते. असे आमची भारतीय संस्कृती मानते म्हणूनच कुमारिकेस आमच्या व्रतवैकल्यात विशेष महत्त्व असते.
 पण आज ? ज्या कुमारिकेला समाजात, धर्मकार्यात महत्त्वाचे स्थान होते, जी कुमारिका तेजाचे प्रतीक मानले जाई त्या 'कुमारिके' बद्दल आम्ही भारतीय...२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेले भारतीय काय विचार करतो ? कोणती कृती करतो?
 कौमार्याची कल्पनाच किती मधुर ! कौमार्य विकासोन्मुख असते. स्त्री जातीची सुकुमारता, सर्जनक्षमता आणि प्रसंगी दाहक अशी तेजस्विता त्यातून व्यक्त होते. व्यासमहर्षीनी द्रोपदीला दिलेली तीन विशेषणे... भाविनी, मनस्विनी

कुमारिका... समृद्धीचा आदिबिंदू / ६३