पान:मनतरंग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तनामनात रुजवीत काही लिहावे, लिहवून घ्यावे यासाठी लोकसंख्या शिक्षण विकास कार्यक्रमांतर्गत २०-२२ लेखक एकत्र आले आहेत. डोळ्यांनी भरभरून साठवून घेतले तरच लेखणीतले प्राण जागणार. कागद, पेन सारे काही जवळ आहे पण डोळे या घनघोर हिरवाईने बावरून गेलेले. कान वाघाची डरकाळी ऐकायला आसावलेले. मधूनच मोरपंखांची क्षणभरच लकाकून सुम्म होणारी सळसळ. माकडांची वर्दळ मात्र बिनधास्त. हे सारं निरखताना भोवतालच्या डोंगरातील कोरकूशी बातचीत करताना दोन दिवस कसे गेले कळले नाही. इथे आल्यापासून आकाश पावसाळी ढगांनी घेरलेले होते. रिपरिपही सुरू होती. दिवसा थोडीफार उघडीप असे, पण रात्र मात्र धुवाधार पावसाची. त्यातून सागाच्या रुंद आणि दडस पानांवर थेंब पडले की त्याचा आवाज अधिकच घुमटदार बने. माझ्या लहानपणी नवरात्रात शेजारच्या घरी मंत्रजागर केला जात असे. एकासमोर एक असे, आठ दुणे सोळा वेद जाणणारे गुरुजी बसत. आधी एक गट काही मंत्र गाई. त्यानंतर दुसरा गट. चढाओढीने हे मंत्र गायले जात. त्या साग वनातल्या पाऊसरात्री मंत्रजागराची सय जागवून गेल्या.
 तिसऱ्या दिवशी पहाटे जाग आली ती सुसाट वेगवान आवाजाने. तो आवाज होता सिपनेचा, सिपनेच्या पात्राजवळ काही रुंद डेऱ्याचे अर्जुन वृक्षही आहेत. त्या अर्जुन वृक्षांना कवेत घेऊन सिपना फणफणत, फेसाळत, उड्या मारीत धावत होती.
 चहा घेण्यासाठी संकुलाच्या उपाहारगृहात आलो तर कळले की सिपना नदीवरच्या पुलावरून किमान पुरुषभर पाणी वाहत आहे. आभाळ फाटावे तसा दिवसाही पाऊस कोसळत होता. सिपनेचे पाणी चढतच चालेले. त्यात कालपासून विजेनेही असहकार पुकारलेला. त्या अंधाराला मिट्ट म्हणावे की किट्ट म्हणावे यावर लेखकांची चर्चा सुरू होती. बाटलीत रॉकेल नि झाकणांला भोक पाडून त्यात जुन्या कपड्याची वात लावून पेटलेली दिवली. जेमतेम उजेडाची. त्यात लेखण्या चालाव्यात कशा ? दिवसभर चढत्या पाण्याकडे पाहताना उरातली धडधड वाढलेली होतीच. पलीकडच्या तीरावरची... अवघ्या चाळीस पन्नास मिटरवरची माणसे फक्त दिसताहेत. अंधारात तीही नाहीशी होतात. सेमाडोह या गावाचा एक चिमुकला भाग, गावापासून तुटून बाजूला पडलाय... 'साहेब, आज खिचडीच खावी लागणार. काल दुपारी गिरणीवर गहू पाठवले. सकाळी पीठ

कम्युनिकेशन गॅप / ५७