पान:मनतरंग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणणार होतो, पण... मॅडम, चार सालाखाली सिपनेचा पूर करेक्ट सहा दिवस उतरला न्हवता. आमाले तर दोन दिस दाना खाया मिळाला नव्हता. चहाची पत्ती संपलीय. पण घाबरू नका. सागाची पान टाकून बी चा करता येतो...'
 अंधार मिट्ट वा किट्ट होता की नाही कुणास ठाऊक ! पण अंगावर घोंघावत येणारा मात्र होता. मनासमोर उलगडत येत होती घराची लाखो चित्रे. एका लेखकाला तर मानससरोवरातील घटना आठवल्या. ही सिपना आपल्या झोपड्यापर्यंत तर येणार नाही ना ?... मग गटांगळ्या खाताना काय होत असेल? वगैरे, वगैरे.
 आज संवादाच्या विविध साधनांनी आम्ही एकमेकांशी जोडलेलो असतो. मग ते रस्ते असोत वा विजेरी दिवे, रेडिओ वा टेलिफोन, वर्तमानपत्रे वा दूरदर्शन. अशा अनेक भौतिक यंत्रांनी आमच्यातले डोळ्यांना दिसणारे अंतर कमी केले आहे. साधा टेलिफोन नादुरुस्त झाला तर आम्हांला तुटल्यागत वाटते आणि इथे तर ना वीज, ना रस्ता, ना टेलिफोन. वायरलेस सुद्धा नदीच्या पलीकडे. तुटलेपणाची चिरत जाणारी जाणीव अनुभवताना मनात आले, या डोंगरातल्या डांगातून... कोरकूच्या वस्तीला ते डांगा म्हणतात... कशी राहात असतील ही माणसे ? कसा साधत असतील एकमेकांशी संवाद ? संवाद म्हणजे आधारच. जगण्यासाठी धीर देणारा, प्रेरणा देणारा. हिंमत देणारा.
 वैरीण झालेल्या नदीमुळे तुटलेल्या संवादाचे कारण निसर्गाचा कोप असेल पण एकत्र राहणाऱ्या... एका घरात राहणाऱ्यांच्या मधले संवादही तुटलेले असतात. शेजारी झोपणाऱ्या, गरजेपोटी एकमेकांत शरीराने गुंतणाऱ्या पतिपत्नीमध्ये शेकडो कोसांचे अंतर असते. उफाणलेली सिपना दोन दिवसांत शांत होईल. मग रस्ताही सुरू होईल. निसर्गाने निर्माण केलेली 'कम्युनिकेशन गॅप' एक ना एक दिवस सांधता येते. पण मनांनी... धर्मानी... जातींनी निर्माण केलेली कम्युनिकेशन गॅप कधी नि कशी सांधली जाणार...?...?

■ ■ ■

मनतरंग / ५८