पान:मनतरंग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 युगायुगाचे बंध झुगारून आज सिपना नदी नुस्ती उफाणतेय. माजावर आलेल्या वाघिणीसारखा तिचा खर्जातला धुमसता आवाज. जणू दुर्गेशनंदिनी. कठोर देखणे रूप घेऊन काळावर धडका देत धावणारी आणि तिच्या अल्याड अडकलेले आम्ही.
 चार दिवसांपूर्वीची सकाळ. समोर उभा होता आमच्या स्वागतासाठी सागाचा घनदाट परिवार. डोंगराला पाठ देऊन उभी असलेली कुटुंबातील वडीलधारी झाडे, रुंदबंद पानांवर खानदानी नर्म हासू घेऊन उभी होती. त्यांच्या पुढ्यात कुटुंबातील प्रौढ झाडे अदबीने उभी. साऱ्यांचेच माथे चांदणफुलांच्या नाजूक जाळीने सजलेले. आणि पायाशी उभी आहे चिमुकल्या झाडांची दाट पिलावळ. सेमाडोहच्या परिसरात आल्यावर वाटले की हिरव्या पानेरी समुद्राच्या तळाशी, निवान्त राज्यात आम्ही आलोय. हऱ्याभऱ्या वनखात्याच्या हरितसंकुलात शिरताना 'सिपना' पार करावी लागते, सिपन म्हणजे सागाचे झाड, सिपना... सागाच्या घनदाट बनातून वाहणारी नदी. 'सिपना' च्या चंद्राकार पात्राच्या काठाने तंबूवजा विटा नि सिमेंटच्या राहुट्या उभ्या आहेत.सिपना डोंगरावरून उड्या घेत येते. त्यामुळे तिच्या प्रवाहात एक घुमता नाद आहे. तो नाद ऐकत, भवतालचे निवांतपण

मनतरंग / ५६