पान:मनतरंग.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कॅनडाला गेले होते तेव्हा सॅस्कॅटूनच्या शासकीय महिला प्रगती केंद्राला भेट दिली. तिथे घराचे 'घरपण' टिकावे, कुटंबातले नातेसंबंध सुखद आणि हवेहवेसे राहावेत यासाठी अनेक छोटी माहितीपत्रके हाती आली. त्यात 'संवेदनक्षम पिता बनवण्यासाठी' असे सुरेख माहितीपत्रक होते. पतिपत्नीच्या संवादाचा वा विसंवादाचा घरावर, चिमुकल्यांवर होणारा परिणाम, विविध उदाहरणे, व्यंगचित्रे यांतून रेखाटला होता.
 खरे तर घर... वा कुटुंब निर्माण केले स्त्रीनेच. मातृत्वाची जबाबदारी तिच्यावर सोपवून, निसर्गाने जणू 'भविष्यकाळा' चे बीज तिच्या उदरात पेरले. जर घरातील स्त्री सुजाण, आपल्या उबदार पंखांत सर्वांना सामावून घेणारी असेल तर ते घर सर्वांचे राहते. अंभंग राहते. पण 'घर'च तिचे राहिले नाही. तिला तिचा अधिकार... सन्मान मिळाला नाही तर तो होतो 'कोंडवाडा.'
 त्या मुलीला एक बाप, दोन आया आणि पाच भावंडं होती, डोकं टेकायला एक खोली होती. पण तिला मिळालं होतं का घर ? माया देणारं, अडीअडचणीच्या वेळी आधार देणारं... सुरक्षितता देणारं... ?
 असं घर कितीजणींना मिळतं ?...

■ ■ ■

घर/ ५५