पान:मनतरंग.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी दोन रुपयांची तीन केळी घेऊन खाल्ली.
 रात्र चढत होती. स्टँडवरची गर्दी कमी होऊ लागली. काही रिक्षावाल्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तिला चहा पाजला. चिवडा दिला. एक जण म्हणाला, त्याच्या घरी घेऊन जातो. घरात बायको, मुलं आहेत. दुसऱ्या दिवशी पाटोद्याच्या गाडीत बसवून देऊ. तिला घेऊन रिक्षाजवळ येताच दुसऱ्या रिक्षावाल्याने रिक्षात कोंबले नि रिक्षा सुसाट पळवली.
 रात्री केलेला फोन एका रिक्षावाल्यानेच केला होता असं कळलं. त्या तेरा-चौदाच्या बाळीला बलात्कार केला, की तसा प्रयत्न केला यातला फरकही कळत नव्हता.
 "या पोरी बी लई मोकाट सुटल्यात. कशाला घराभाईर पडावं ? सावतर झाली तर मायच की. चार दिवस जेवण केलं नाय तर मरत न्हवती."
 "ताई, तुमी काय बी म्हना. बायांनी जपूनच ऱ्हावं. वय काय ते लेकराचं? लई भोगलं बाळानं. गांगरून गेलंया. पण घर सोडलं की असंच व्हनार."
 खाकी वेशातली मतं. तीही माणसंच की.
 वैद्यकीय तपासणीनंतर मुलीला पोटद्यास, सख्या आईकडे पोहोचविण्याचे ठरले, तिच्याजवळ एका कार्यकर्त्याला ठेवून मी घरी परतले. परतताना मनात शब्द ठेचाळत होते...घुमत होते.
 बाईने वा मुलीने घर सोडू नये... घर सोडू नये... घर... घर घर, चार भिंतीचे. माया देणारे, सुरक्षितता देणारे. केवळ स्त्रीलाच नव्हे तर घरात राहणाऱ्या सर्वांना सुरक्षितता देणारे.
 घर केवळ दगडविटांनी रचलेल्या चार भिंतीचे असते का ? त्यात राहणारी माणसे एकमेकांशी भावबंधाने जोडलेली असतात. नाती धर्माची असोत वा कर्माची, किंवा रक्ताची. त्यांच्यात मनाचे जोडलेपण नसेल तरी ती दगडमातीची, निर्जीव बनतात. त्यांची तुमच्यावर बांधीलकी राहात नाही.
 घर म्हटले की त्यात राहणारे पतिपत्नी, मुलं, आजी-आजोबा अशी माणसे किमान असणारच. त्यांच्यात परस्परांबद्दल ओढ हवी, विश्वास हवा. असतो का तो ? पतीला पत्नीबद्दल संशय, पत्नीला पतीबद्दल, सासूला सुनेबद्दल विश्वास नाही आणि सुनेला सासूबद्दल ओढ नाही. ही नाती फक्त शब्दांची. विधिनियमांनी जखडून बांधणारी पण ही बांधीलकी फक्त बाईला.

मनतरंग / ५४