पान:मनतरंग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ...अंगावर गुलाबी केशरी छिटाचे ढगळसर परकर पोलके. उंची बरी, बारकुडी अंगयष्टी. जेमतेम केसांची घट्ट वेणी. तेलकट चेहरा. बावरलेले... घाबरलेले... हरवलेले उदास डोळे. जेमतेम तेरा चौदाची असावी. अंग चोरून बाकावर बसलेली, मी तिथे गेल्यावर भवतालची गर्दी कमी झाली, चारपाच पोलिसांनी एकटीला प्रश्न विचारायचे, म्हणजे गर्दीच की.
 "बेटा तू या गावची नाहीस. कशी आलीय इथं. कुठं जायचं होतं तुला? चुकीच्या एस.टीत बसलीस का ? मला सांगशील सगळं ?..." आवाज शक्य तितका मऊ करीत मी प्रश्न केला.
 तिने माझ्या डोळ्यात रोखून पाहिले. त्यात अविश्वास होता.
 "घाबरू नकोस मी पोलिस नाही. मी तुझी मावशी वा बाई समज. आणि रीतशीर सगळं सांग." मी
 हळूहळू ती मोकळी झाली, बीडजवळच्या बऱ्यापैकी मोठ्या गावात तिचे वडील राहतात. ते हॉटेलात काम करतात. रोज ७०/७५ रुपये मिळवतात. त्यांना दोन बायका आहेत. पहिलीला दोन मुली आणि दुसरीला तीन मुली, एक मुलगा. ही पहिलीची धाकटी. तिची आई पाटोद्याजवळच्या खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाई म्हणून काम करते. पहिलीच्या दोन्ही मुली, दुसरीच्या तिन्ही मुली नि मुलगा, दुसरी नि वडील असे एकत्र राहतात. ही मुलगी सहावीपर्यंत शिकली. घरकामासाठी सातवीतून घरी बसवले. वडिलांना दारूचा नाद. खाणारी माणसं आठ. सावत्र आई कामाला जात असे. तिला पहिलीच्या मुलींची अडचण होई. मुलीच्या लग्नाचे वेळी बाप लागतोच, या विचाराने मुलींची आई दरसाली मुलींना कपडे करी. थोडे फार पैसे पाठवी. पण मुलींनी बापाच्या दारात राहावे असे तिला वाटे. पण मुलींना सावत्र आई जाच करी. काम खूप पडे. ना डोक्याला तेल, ना पोटभर अन्न. त्यात सावत्र आईच्या शिव्या, मार, उपाशी ठेवणं वगैरे आलंच.
 दोन दिवसांचा उपास नि भरपूर मार यांनी वैतागलेली ती बीडपर्यंत चालत आली. एस.टीत बसल्यावर एवढा थकवा आला नि झोप लागली की. मांजरसुंब्याला उतरून गाडी बदलण्याचे भान राहिले नाही. जाग आली तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली. गाडीतून उतरली आणि लक्षात आले की सारे नवे आहे. गाव, माणसं, भवतालचा परिसर. पोटात भुकेचं काहूर आणि हातात फक्त दोन रुपयांची चिंधाटलेली नोट. ती गच्च पकडून दुकानांसमोरून एक फेरी मारली.

घर/ ५३