पान:मनतरंग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रात्रीचे अकरा, साडे अकरा वाजले असतील. एका अनामिकाचा फोन.
 "ताई एस.टी. स्टँडवर एक पोरगी संध्याकाळपासून एकटीच हिंडत होती. चुकलेली असावी. तिला दोन रिक्षावाल्यांनी बळजबरीने रिक्षात घालून नेलया. आमी पोलिसांत फोन केला वता. पण त्ये काई दाद घेत न्हाईत. तुमी फोन करा, नाय तर काय तरी व्हईल."
 हा फोन खरा की उगाचचा उद्योग ? असा प्रश्न मनात आला, तरीही हात आपोआप फोनकडे वळले आणि शंभर नंबर फिरवला गेला. पोलिस स्टेशनला अनामिकाच्या फोनबद्दल सांगितले आणि योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली.
 दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन खणाणला, एक पत्रकार सांगत होते, 'ताई, दोन रिक्षावाल्यांनी एका मुलीला उचलून रानात नेली नि तिच्यावर जबरदस्ती केली. पहाटे पाचच्या सुमारास मुलगी सापडली. तुम्ही रात्री पोलिस स्टेशनला फोन केला होता म्हणे ! तिला भेटायला चलणार का? मीही जातोय."
 फोन ऐकून सुन्न झाले. रात्रीच्या फोनकडे मी दुर्लक्ष केले असते तर ? त्या मुलीला दडपणातून बाहेर काढणे आवश्यक होते. मी पोलिस स्टेशनमध्ये गेले.

मनतरंग / ५२