पान:मनतरंग.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संधीच देत नाही. कळायला लागल्यापासून इथे जाऊ नको... तिथे जाऊ नको, अशी वाग...तशी वाग... बोलायचं हळू नि चालायचं हळू. मग धाडस येणार कसं ? पण वेळ आली अन संधी मिळाली तर ती कमी पडत नाही. अहिल्यादेवी, झाशीची राणी यांच्यावर वेळ आली तेव्हा दाखवून दिले ना त्यांनी धाडस ?"
 "पण अशी 'अवेळ' आली तरच आम्हाला संधी मिळणार का ?"
 मुली बोलत होत्या. मी मनोमन सुखावत होते. ही खेड्यांतली रानफुलं. मुकेपणाने डुलणारी, ना रंगाची जाणीव ना सुगंधाची. समोर येणारी अक्षर वाचायची, पाठ करायची नि पास व्हायचं. वर्तमानपत्र चाळावे, पुस्तकं वाचावीत, जगात काय चाललंय ते जाणून घ्यावं, आपले नि जगाचं नातं काय हे शोधावं असे कुतूहल शिक्षणाने त्यांच्या मनात पेरलेच. शिक्षणव्यवस्था परीक्षांशी जोडलेली. शिक्षण मनापर्यंत...हृदयापर्यंत पोचवण्याची भूमिका शिक्षकांच्या पायाखालून केव्हाच निसटली आहे. सती ज्या शिळेवर पाय ठेवून अग्निचितेवर चढतात तिला 'भूमिका' म्हणतात. शिक्षण देणे हा व्यवसाय झाला आहे. त्यातून खेड्यात 'गुरुजी' धावत-पळत, धापा टाकीत वर्गात येणार आणि एसटीची वेळ झाली की, अर्धा शब्द सोडून घराकडे धावणार. मग या रानफुलांनी जगाची भव्यता, जगाचे सुंदर...सुंदर रूप कोणत्या डोळ्यांनी न्याहाळायचं?
 ज्या परमेश्वराने वा निर्मिकाने हे जग निर्माण केले त्याच्या मनात स्त्रीपुरूष भेद नव्हता. तसे असते तर त्याने स्त्रियांचे आणि पुरुषांचे जग वेगवेगळे बनवले असते. मग शिक्षणव्यवस्थेत तरी स्त्रियांसाठी वेगळ्या शाळा, महाविद्यालये वा विद्यापीठे हवीत कशाला ? असा सवाल केला जातो.
 गेल्या दोन-तीन हजार वर्षांपासून सामान्य स्त्रीचे जगणे इतके 'दगडी' आणि 'निर्जीव' करून ठेवलेय की, त्यांच्यातले चैतन्य जागे होण्यासाठी, त्यांच्यातली जगण्याची कला उमलून येण्यासाठी, जिथे भयाचा, अहंकाराचा, अडचणींचा म्हणजेच पुरुषी वर्चस्वाचा वाफारा नाही अशा अवकाशाची गरज असते तिथेच ही रानफुले उघड्या डोळ्यांनी आभाळ निरखायला शिकतात, भवतालच्या घटनांकडे, जगाकडे विचक्षण नजरेने पाहायला शिकतात. आर्ट ऑफ लिव्हिंग... जगण्याची कला ज्यांना साध्य झाली आहे त्यांचा 'उद्या' उद्यमशील असतो.

■ ■ ■

रानफुलं नि मोकळं आभाळ / ५१