पान:मनतरंग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूजा करीत. पिवळ्या गोड फुलांनी सजलेली काटेरी बाभूळ पाहाताना श्रावण अगदी शिवेवर आल्याची जाणीव होई. कांदेनवमी सामूहिकपणे साजरी होई. त्यात चटकदार उत्साह आयांपेक्षा पोरींचाच. कुणानाकुणाच्या घरी नव्याने लग्न झालेली मावशी... काकू वा आत्या असायचीच. मग सोमवारी शिवामुठीची घाई. मंगळागौर एकीची पण त्या निमित्ताने घरदार, भवतालचा परिसर डुलत राही. १६ पत्री, तऱ्हेतऱ्हेची फुले गोळा करण्यासाठी पोरापोरींचे जत्थे भल्या पहाटे आंघोळ करून उत्फुल्लपणे हिंडत. ज्यांची मंगळागौरीची वर्षे, त्या नवविवाहितांचे डोळे रात्री ११ वाजताच मिटायला लागत. मात्र, जाग्रणासाठी जमलेल्या मुली, प्रौढा, अगदी साठीसत्तरीला पोचलेल्या आज्या उत्साहाने रात्र जागवीत. अंगण दणाणून जाई. सूप नाचवण्यापासून ते लाटण्याचा झिम्मा, तव्यावरची फुगडी... स्वयंपाक घरातील आयुधंही खेळण्यासाठी बाहेत येत. वर्षभर त्याच त्या पाढ्यात फिरणारे, आंबलेले, कंटाळलेले शरीर जणू मोकळे होई, नव्या उत्साहाने उद्याचे स्वागत करण्याठी. दर शुक्रवारी पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून जिवतीच्या कागदाची पूजा केली जाई. घरातील मुलाबाळांना जगन्मातेचा आशीर्वाद मिळावा. आधार मिळावा म्हणूनच व्रते, देवदेव न करणाऱ्यांच्या घरातही शुक्रवार साजरा होई. नागपंचमीचे झोके आभाळावर मात करीत. रात्री गल्लीतल्या बायका आणि मुली चौकात वा मोठ्या अंगणात जमून फेरावरची गाणी गात. ह्या गाण्यांतला करुण सूर मनाला स्पर्शेून जाई पण त्यामागचे अस्वस्थ मन कळत नसे. पंचमीला माहेरी आलेली नववधू लेक. ती भावजयीजवळ तिची कासई नेसायला मागते. पंचमीचे फेर खेळताना कासईला चिखल लागतो. भावजय संतापते आणि नवऱ्याला अट घालते, की 'तुमच्या बहिणीच्या रक्तात माझी खराब झालेली कासई रंगवून आणून द्या. आणि नवरा बहिणीला सासरी पोचविताना वाटेत दगा देऊन मारतो. पत्नीची कासई बहिणीच्या रक्तात रंगवून हट्ट पुरा करतो... हे गाणे गाताना बायकाचा स्वर जडावत असे आणि आमच्या मनासमोर अनेक प्रश्न उभे राहात. नणंद-भावजय, सासू-सूना जावा-जावा यांचं नातं भांडणाचंच असतं ? समजा आम्ही मैत्रिणी उद्या नणदा, भावजया वा जावा झालो तर आम्हीपण एकमेकींचा द्वेष करणार ? हे असं का ? सगळ्या बायकाच मग तरीही ?...?
 राखी पौर्णिमा... नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी, बुधवारी बृहस्पतीच्या

पिंपळपान / ४५