पान:मनतरंग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 नजर पोचावी तिथवर नुसत्या हिरव्या रंगाच्या घनघोर लाटा. दाट गवताचा लुसलुशीत पोपटी रंग, तर उंचउंच वाढलेल्या हरळीचा गर्द हिरवा रंग. गुलमोहोर आता हिरव्यागार पानांनी बहारून गेले आहेत. वाट चुकलेलं एखादं लालजर्द फूल. पानाच्या हिरव्या रंगाची गहिराई आणखीनच गर्द करतं. बुचाच्या ज्याला अजरणी किंवा आकाशमोगरी म्हणतात, तर या झाडांना अश्विनात फुलणाऱ्या पांढऱ्या फुलतुऱ्यांची स्वप्नं पडू लागली आहेत. स्वत:त बुडून गेलेल्या या झाडांच्या पानांचा रंग दाट शेवाळी. आंब्याच्या पानांवर आता अंजिरी छटा चढली आहे आणि मेंदी ? मेंदीची काटेरी झुडपं आता गर्दजर्द रुमझुमत्या पानांनी नुसती झुलताहेत.
 मेंदीची झाडं पाहिली की लहानपण आठवते. पन्नास वर्षांपूर्वीचे दिवस. रेडिओसुद्धा हजारांतून एखाद्या घरात असायचा. लहान मुलांची स्वप्ने साने गुरुजींच्या गोड गोष्टींनी, वा.गो.मायदेव, ग.ह.पाटील यांच्या कवितांच्या रंगखुळ्या स्वप्नांनी गजबजलेली असायची. ज्येष्ठ सरू घातला की, घरातील पोरीसोरींच्या मनात श्रावणभादव्यातील सणांच्या आठवणी रुणझुणू लागत. आषाढात झाडे पूजण्यासाठी घराघरांतील बायका मुलाबाळांना घेऊन रानात जात. बाभळीची

मनतरंग / ४४