पान:मनतरंग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कागदाची पूजा आणि शेवटी वाजतगाजत दारावरून जाणारा पोळा. रंगीबेरंगी बिलोरी झुलींनी सजलेले बैल, त्यांच्या माथ्यावर सुरेख आरसेदार बाशिंगे, रंगवलेली... बेगड चिटकवलेली शिंगे, त्यावर बांधलेले निळे; गुलबक्षी गोंडे. सायंकाळी बैलाचं लगीन अगदी भटजींनी म्हटलेल मंगलाष्टकसुद्धा.
 श्रावणापाठोपाठ भादवा येई. गणपतीच्या सजावटीत गल्लीतली मुलं बुडून जात तर लक्ष्म्यांचा...गौरीच्या मांडणीत घरातल्या लेकीबाळी दंग होत. घराघरांतून लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, शंकरपाळे यांचा घमघमाट एकामेकांत मिसळून जाई. प्रत्येक पदार्थ थोडेथोडे करायचे. दिवाळीत मात्र डबे भरायचे. लक्ष्म्या वा गौरी सर्व जातीजमातीच्या घरातून मांडतात. या काळात खरिपाची पिके दुधात येतात. घरात येणाऱ्या धान्यलक्ष्मीच्या स्वागताचा हा सण. लक्ष्म्या सायंकाळी घरी येतात तिचा सन्मान...स्वागत रानातल्या पालेभाजीने व भाकरीने होते. दुसऱ्या दिवशी मात्र पंचपक्वानांचा थाट. पण पक्वान्नापेक्षा भाज्यांना महत्त्व. सोळा भाज्या, पाच खिरी, डाळीचे वडे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, अन्नब्रह्माची निर्मिती करणाऱ्या गौरीरूप भूमीची ही पूजा घराघरांतून मनोभावे केली जाई.
 घरातल्या लेकीबाळी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ आपोआप शिकत. श्रावणभादव्याचे दिवस भरारा उडून जात.
 हे महिने आले की आजही मन मागे धावते. पुन्हा एकदा शिडीच्या पायऱ्या उतरत थेट आठ-नऊ वर्षाचे होते. मनाचे अंगण रांगोळीने भरून जाते. दिव्याच्या ज्योती नजरेसमोर तेवू लागतात.
 ...मग खूप काही हरवल्याची बोच टोचू लागते. मन गुदमरून टाकणारा 'आज ? ! संध्याकाळ झाली की घरातली मुलं खाणंपिणं सोडून दूरदर्शनच्या काचेरी पडद्यापुढे बसतात. अभ्यासही तिथेच. कुकर लावीत, भाजीला फोडणी घालीत आई...नव्हे मम्मीपण तिथेच रेंगाळणार. पप्पा नाही तर डॅडी घरात आल्या आल्या, झी नाहीतर एस् किंवा वीस-पंचवीसांपैकी त्यांना आवडणारे चॅनल लावणार. मग त्यावरून घरात वादावादीही रंगणार. श्रावणभाद्रपदातली धांदल आता 'स्वीट होम्स' नी थांबवली आहे. या साऱ्या गोंधळात 'शुभंकरोति' हरवून गेलेय जमेल तेव्हा म्हटलं जाणार, एवढेच. साने गुरुजींची जन्मशताब्दी साजरी होतेय. तेही मुलांच्या मनातून हरवलेले.

मनतरंग / ४६