पान:मनतरंग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वडीलभावांनी दिलेल्या किंवा इकडे तिकडे सापडलेल्या फुटक्या-तुटक्या पेन्सिली आणि मोठ्यापासून चालत आलेली फाटकी पुस्तके, या भांडवलावर सातवीपर्यंत पोचली. कळायला लागलं तेव्हापासून चुलीवरचा स्वयंपाक, पाणी आणणे, लाकूडफाटा रानातून गोळा करणे, खुरपायला नाहीतर कपाशी वेचायला जाणे, आई रानात गेली तर लहानग्याला सांभाळणे ही कामे नेहमीचीच झालेली. त्यातून थोडा वेळ मिळाला तर उरात नवी ओढ घेऊन शाळेत जायचे. झालेला अभ्यास मैत्रिणींच्या मदतीने भरून काढायचा. एवढी धावाधाव करताना प्रगतीपुस्तकावर कुठे ना कुठे लाल रेघ यायचीच. एक दिवस जीवनातही लालरेषा उमटल्या. 'मुलगी श्यानी झाली आता लिवनं बंद' अशी तंबी घरातून मिळाली, मग शाळा बंद !! आणि दोन वर्षांत भरल्या चुड्याचे मेंदीरंगले हात घेऊन, नाजूक जोडव्याची टक्-टक् उमटवीत, हळदकुंकवाच्या पावलांनी पतिदेवांच्या मागे ती नव्या घरात आली, नव्या माणसांत आली. नव्या नवलाईचे चार दिवस छान गेले.
 "ताई, तीनचार महिने लई चांगले गेले वो. ते गोड बोलायचे. मोठ्यांची नजर चुकवून चॉकलेट, बिस्किटाचा पुडा, पेढे आनायचे. डोक्याला लावायच्या झालरी, पिना... काय काय आनायचे. पण पिंकी पोटात ऱ्हाईली. मळमळ, उलट्यांचा तरास सुरू झाला, भूक बी लई लागायची. घरात कामाचा रेटा भरपूर. आता घर म्हटलं की काम आलंच. त्यात शेतकऱ्याचं घर. खानारी मानसं धा.
 "अन् खरं सागू का ? पिंकीच्या पप्पांचे वेडेवाकडे हट्ट पुरवताना जीव लई तरसायचा, त्यातून सारंच उलटून पालटून गेलं... मंग मार सुरू झाला. आमच्या बापूंनी हुंड्यातले सात हजार नंतर देऊ सांगितलं होतं. ते व्याजासंगट द्या असा हेका सासऱ्यानं... मामाजींनी धरला, पोरगी लईच नाजूक हाय. कामात कच्ची हाय असा कांगावा सुरू केला. सहाव्या महिन्यातच माहेरला आणून घातलं. त्यात पिंकी जलमली; पोरगा झाला असता तर नेल्यं बी असतं.
 "चार वरसापासून माहेरलाच रहाते मी. पिंकीच्या पप्पांनी दोन वरसाखाली दुसरं लगीन केलं. पोरगा बी झालाय म्हनं. आमचे बापू लई थकलेत. माय गेल्या साली खरचली... सुटील. भाऊ मला सांभाळाया तयार न्हाईत. दोन एकरात कुनाकुनाचं भागवावं त्यांनी. मोठे दोघं ममईला असतात.
 "तुमी मदत करता असं अैकलं म्हणून बापूंनी हितं आनलय मला.

मुकं आभाळ / ४१