पान:मनतरंग.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 उदास आभाळ. दिवसरात्र गळणारे ओठ दाबून मुक्यानं रडणारं...
 श्रावणातले ऊन-पावसाचे बिलोरी खेळ आता थांबले आहेत. सुरुवातीच्या रुसव्याफुगव्यातलं रडणं आणि मन भरून हसणं वा रुसणं, श्रावणासारखं प्रसन्न असतं. मनाला ताजवा आणि उभारी देणारं असतं. सदाबहार हरितस्वप्नांचे मोर डोळ्यांत कसे उमलून नाचत असतात. पण, पंचमीची लालम् मेंदी, रोजन् रोज फिकी होत जाते तसेच, हे झुलते मोर पंख मिटवून कधी उडून जातात ते कळत नाही...
 मग मनभर... तनभर पसरून जातं, ऊनं नसलेलं, सुन्न राखाडी... कोनफळी आभाळ ओठ दाबून मुक्यानं गळणार...
 ही पार्वती. जेमतेम चार फूट दहा इंच उंचीची, गोरा रंग, घारे डोळे, दाट काळेभोर गुडघ्याखाली येणारे केस. ओठ असे, जणू त्यांना खूप खूप काहीतरी बोलायचंय, सांगायचंय पण शब्दच हरवलेले, म्हणून घट्ट मिटलेले. आकंठ भरलेल्या धरणाचे दरवाजे गच्च मिटलेले असावेत तसे..
 खेड्यात जन्मलेली ही मुलगी, चारसहा भावाबहिणींतील एक. भवतालच्या घरातील मुली जातात तशी हीपण शाळेत गेली. फुटकी पाटी,

मनतरंग / ४०