पान:मनतरंग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"रेशमी पदरात या अग्निफुले मी वेचिली
धुंद होऊन चालताना वेदना ओलांडली ।"

 आज 'व्हॅलेंटाईन डे' या एका मधुर पाश्चात्त्य बसंती दिवसाचे अनुकरण करताना आमच्या मातीतून उगवलेल्या संस्कारांची आठवणही ठेवायला हवी. आज प्रेमाला 'मूल्य' आहे का ? ते केवळ शरीराशी...त्याच्या आकार उकारांशी जोडलेले आहे. गदिमा एका ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणतात, शरीराच्या जवळिकेतून मनाच्या बांधीलकीपर्यंत... आत्मिक नात्यापर्यंत कसे पोचलो हे कळलेच नाही. प्रेमातही प्रवास शरीराच्या माध्यमातून सुरू झाला तरी त्याचा न संपणारा शेवट हृदयात्म्यापर्यंत, मनापर्यंत असतो. म्हणूनच प्रेयसीला वचन देताना भा. रा. तांब्यांच्या ओळी तनामनात घुमवायच्या असतात,

"...तिन्ही सांजा सखे मिळाल्या
देई वचन तुला
आजपासून जीव अधिक तू मला..."

 व्हॅलेटाईन डेच्या पाश्चात्त्य रंगात आमच्या मातीचा ओलावा नि गंध मिसळला तर रिंकू पाटील, अमृता देशपांडे यांची मालिका तयार होणार नाही आणि निसर्गात जागोजागी फुललेल्या केशरी पलाश कुसुमांच्या बसंती मुहूर्तावर आम्हीही...म्हणजे आमच्या देशातील तरुणाईही ढोलकच्या तालात गाऊ शकेल.

"दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचेऽऽऽ"

■ ■ ■

मनतरंग / ३६