पान:मनतरंग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाहून त्यावेळी मीच माझ्या मुलांना फोन करून मनातला आनंद त्यांच्यापर्यंत पोचवला होता.
 नाते मनाचे असते तसे तनाचे असते. तसेच ते विचारांचे असते. याची जाणीव या विशेष दिवसांच्या निमित्ताने करून घ्यायची असते आणि करून द्यायचीही असते. १४ फेब्रुवारी हा 'व्हालेंटाईन डे' तरुणाईच्या गालावर गुलाबी रंग असतोच. ती गुलाबी माधुरी व्यक्त करणे मात्र अती अवघड. शब्दसुद्धा जुळताना दगडासारखे कठोर वाटायला लागतात. अशावेळी आपल्या मनातल्या 'माणसा'ला फुलांची भेट देऊन प्रेमाची बसंती चाहूल जाणवून देणे सोयीचे नि सोपेही. त्यासाठी तर हा दिवस ! पण भावनेचा जेव्हा बाजार मांडला जातो तेव्हा त्यातील कोमलता संपून जाते. तरुणाईत प्रवेश केला की मानवी मनाला बसंती मोहर फुटू लागतो. एखादी व्यक्ती सतत डोळ्यासमोर येऊ लागते. हे नैसर्गिक असले तरी निसर्गाला माणसाने तरी मोकाट सोडून चालणार नाही. नैसर्गिक भावनांचे सामाजिकीकरण करून त्याला नैतिक, सांस्कृतिक आधार द्यावा लागतो, बळ द्यावे लागते.
 भारतीय मातीने प्रेमाला मूल्य मानले आहे. म्हणूनच मूळ महाभारतात अस्तित्वात नसलेली 'राधा' प्रीतीचे मधुगंध घेऊन श्रीकृष्णाशी जोडली गेली. ज्या तत्त्वासाठी माणूस समर्पित होण्यासाठी तयार होतो त्याला आपण 'मूल्य' म्हणतो. कवी गोविंदाग्रजांच्या 'प्रेम आणि मरण' या कवितेत विजेवर जीव टाकणारा वृक्ष म्हणतो, “क्षण पुरे एक प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा' आणि मृत्यूला कवटाळतानाही तो अखेरच्या क्षणी बहरून जातो.
 प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी ! ही ओळ आम्हीही चाळीस वर्षांपूर्वी समर्पून प्रेम केले तेव्हा सतत आळवली. इतकेच काय प्रेमाची बांधीलकी तनापेक्षा मनाची असते हा संस्कार कवितांतून भवतालच्या वातावरणातून मिळाला. अशा किती तरी ओळी -

"काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या वेशीवर उभे दिवसाचे दूत ।"

"गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच ती विलसतसे लाली ।"

एक बसन्ती नाते / ३५