पान:मनतरंग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 ८ मे १९९४ चा दिवस. त्या भव्य, निर्मनुष्य पण रंगीबेरंगी मोटारींच्या वेगाने शहारणाऱ्या रस्त्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यावर फुलांचे देखणे थवे, हारीने मांडून काही महिला उभ्या होत्या. एक तर इथे माणसे, तीही शांतपणे उभी असलेली क्वचितच दिसणार. मग तरीही या महिला कोण ? हा प्रश्न माझ्या मनात. तो दिवस मातृसन्मान दिवस... 'मदर्स डे' होता. हरेक मूल मग ते सत्तरी ओलांडलेले का असेना, त्याच्या नव्वदीतल्या आईला या दिवशी भेटणारच ! अगदी चिमुकले पिल्लू त्याच्या तिशीतल्या 'माय' ला फुले नि शुभेच्छा देणार. मला तर ती कल्पना...विशिष्ट दिवशी आईचा जाणीवपूर्वक सन्मान करण्याची कल्पना अगदी हृदयापासून भावली. आमच्याकडे ज्या घरातील पुत्रवती स्त्री मरण पावली असेल तिच्या नावाने भाद्रपद कृष्ण नवमीस सौभाग्यवंती पुत्रवतीस जेवण देण्याची प्रथा आहे. त्याला 'आईनवमी' म्हणतात. पण त्यात कारुण्य असते. मृत आईची ती आठवण असते. पण ८ मे हा दिवस युरोप-अमेरिकत उत्साहाने साजरा होतो तो मातृसन्मान दिवस म्हणून. गेल्या काही दिवसांपासून व्हॅलेंटाईन डे...प्रेमबसंती दिवस साजरा करण्याची चर्चा दूरदर्शन, वर्तमानपत्रे यांतून होताना दिसली. त्यामुळे मी अनुभवलेला मातृदिवस मला आठवला. त्या दोन-तीन दिवसातला उत्साह

मनतरंग / ३४