पान:मनतरंग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्यासाठी ती नवलाईची गोष्ट होती कारण अनेक घरी खालच्या जातीतील मुलींना स्वयंपाकघरात व पाण्यापर्यंत येऊ दिले जात नसे. या खालच्या जातीच्या प्रकरणात ब्राह्मणेतर सर्व जाती येत. माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरांतून त्यांच्यासाठी कपबशाही वेगळ्या असत. मी आंतरजातीय विवाह केला आणि अंबाजोगाईसारख्या काहीशा कर्मठ गावात आले.
 एकदा एका घरी आम्हांला जेवायला बोलावले. मी आणि कै. सिंधूताई परांजपेंना. आमचे पाट मुख्य ओळीच्या नव्वंद अंशाच्या कोनात आडवे मांडलेले होते. मला त्याचा अर्थ काहीच कळला नाही. जेवण आटोपून घरी जाताना सिंधूताई म्हणाल्या, 'शैला, तुला आडव्या पाटाचा अर्थ कळला का ? तू बामणाची लेक मारवाड्याच्या घरात आलीस आणि मी बंजारीण बामणाच्या घरात आले म्हणून आपले पाट आडवे. आपण बाटग्या ब्राह्मण.' हा वस्तुपाठ मला नवाच होता आणि मग आम्ही दोघीही मनसोक्त हसलो.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजातील सर्वांना नवा मार्ग दाखवला. वास्तविक पाहता बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी हिंदूंनी त्यांना समजून घ्यावे यासाठी खूप वेळ दिला. माणूस...मग तो काळा, गोरा, पिवळा, सावळा कोणत्याही रंगाचा असो. तो माणूसच असतो. त्याला मन असते. कार्यकारण भाव लावून विचार करण्याची शक्ती असते. ते विचार व्यक्त करणारी वाणी असते. म्हणूनच माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. एवढीच माणसाची माणसाकडून अपेक्षा असते. ही अपेक्षा हिंदू म्हणवणाऱ्यांचे पौरिहित्य करणाऱ्यांना कधीच उमजली नाही. कारण त्यांच्यातले 'माणूसपण' अहंकाराच्या लेपामुळे लोपून गेले होते. डॉ. बाबासाहेबांना आर्य समाजानेही समजून घेण्याचा मनस्वी प्रयत्न केला नाही. तसे झाले असते तरी परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरले असते.
 हजारो वर्षांपासून हिंदू मनात खोलवर गोंदले गेलेले चुकीचे विचार परमेश्वराच्याच माध्यमाचा वापर करून घालविण्याचा प्रयोग महात्माजींनी केला असावा. चातुर्वण्याच्या बिनजिन्याच्या चौमजली इमारतीला आता बऱ्यापैकी झादरे बसू लागले आहेत. ते किल्लारीच्या भूकंपाइतके जोरदार, किमान ७.३ रिष्टरचे असायला हवेत, तरच 'हिंदू' हा धर्म नसून ती जीवनप्रणाली...' Way of Living आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल.

■ ■ ■

हिंदू...धर्म की जीवनप्रणाली ?