पान:मनतरंग.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तर माझ्या आजोबांनी ऐकले आणि त्यांनी उसळून उत्तर दिले ते असे, 'तुमच्या धर्मात परदेशगमन, परस्त्रीगमन, विलायती मद्यप्राशन या गोष्टीही निषिद्ध आहेत. जो ब्राह्मण माणूस शिक्षणासाठी परदेशी गेला, येताना प्रथम पत्नी असतानाही मडमिणीला घेऊन आला, जो पाण्यासारखी विदेशी दारू पितो, अशा माणसाच्या घरी तुम्ही भटजी, दक्षिणा जास्त मिळते म्हणून जाता आणि धार्मिक कार्य करण्याचा अधर्म करता. माझा मुलगा माणसांबरोबर जेवला हा काय अधर्म आहे? जन्माला येणारा माणूस...माणूस म्हणून जन्माला येतो. कपाळावर जात लिहून जन्माला येत नाही; यापुढे माझ्या घरातील सर्व धार्मिक कार्ये, श्राद्ध बंद !' तेव्हापासून आमच्या घरातील श्राद्ध बंद झाले आणि स्व. काकासाहेब बर्वे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या हरिजन छात्रालयाला २५ रुपये देणगी दिली जाऊ लागली.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाची अस्मिता जागी केली. हजारो वर्षे अंधारयात्री असलेल्या दलित समाजाला प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी सबल, सजग केले. 'शिका आणि संघटित व्हा' हा मंत्र त्यांच्या मनात पेरला आणि अवघ्या १५/२० वर्षांत दलित समाजातील सर्वांगीण जागृतीचे उत्साहवर्धक दर्शन समाजातल्या प्रत्येक क्षेत्रांत उमटू लागले; हे जरी खरे असले तरी अ-दलित किंवा जे उच्चवर्णीयांत जन्मले, अशांच्या मनातील स्पृश्यास्पृश्यतेची तेढ कमी करण्याचे श्रेय महात्माजींनाच द्यावे लागते. हरिजन या शब्दाबद्दलचा राग आज जन्माने ब्राह्मण असलेला माणूस समजू शकतो परंतु हे समजून घेण्यापर्यंतची वाटचाल महात्माजींनी सुरू केलेल्या 'अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे.' या वाक्यापासूनच सुरू होते. महात्माजींच्या विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या घरातून किंवा गटातून 'जात' स्वयंपाकघरातून नष्ट झाली होती. राष्ट्र सेवा दलाचे युवक-युवती 'घ्यारे हरिजन घरात घ्यारे-जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित तया जाऊनि उठवावे | जगाला प्रेम अर्पावे।। यासारखी साने गुरुजींची गीते म्हणत. ही गीते म्हणणाऱ्या अनेक तरुण-तरुणींच्या मनातून जातीयतेचे घट्टपणे चिटकलेले पापुद्रे आपोआप गळून पडले.
 मला आठवते आमच्या घरात प्रत्येक सणावाराला हरिजन छात्रालयाच्या मुलींना आई जेवायला बोलवीत असे आणि त्यांना भाज्या-कोशिंबिरी कशा करायच्या हे आवर्जून शिकवीत असे. आमच्या घरी अर्थातच सर्व जातिधर्माच्या भरपूर मैत्रिणी गोळा होत. त्यांना पाण्याच्या माठापर्यंत जायची मुभा असे.

मनतरंग / ३२