पान:मनतरंग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सुमारे ६५ ते ७० वर्षांपूर्वीची गोष्ट होती. त्या काळात शिवाशिवीचे प्रस्थ समाजाच्या रोमारोमात घुसलेले होते. तसे ते शेकडो वर्षांपासून घुसलेलेच आहे म्हणा ! अशा काळात आमच्या पप्पांनी...माझ्या वडिलांनी सहभोजनाचा उपक्रम धुळ्यासारख्या खेड्याचा चेहरा मोहरा असलेल्या-गावात सुरू केला. महात्मा फुलेंनी म्हटले आहे की शिक्षण हा मानवाला लाभलेला तिसरा डोळा आहे. हा तिसरा डोळा ज्याला खऱ्या अर्थाने लाभतो त्याला मानवी जीवनाचा आदिकालापासून शोध आणि वेध घेण्याची तसेच कार्यकारण भावातील स्पष्टता जाणण्याची क्षमता प्राप्त होत असते. पप्पांना हा तिसरा डोळा लाभला होता. त्यामुळेच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेऊनही स्पृश्य-अस्पृश्य तसेच जातीय भेद त्यांच्या मनाला...जीवनाला कधी शिवलेच नाहीत.
 कांबळे नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांच्या सहकार्याने त्यांनी सहभोजन आयोजित केले. त्याचा परिणाम असा, ब्राह्मणांनी आमच्या घरावर बहिष्कार टाकला. माझ्या आजीचे श्राद्ध घालण्यास भटजींनी नकार दिला. 'तुमचा मुलगा महारा-मांगाच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि जेवतो. अधर्म माजवतो, अशा घरात श्राद्ध घालण्यासाठी येण्याचा अधर्म आम्ही करणार नाही', असे

हिंदू...धर्म की जीवनप्रणाली ?