पान:मनतरंग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हळदीचे नि १६ कुंकवाचे ठिपके देऊन त्याच्या खाली राख आणि शेणाचे मुटके मांडतात. हे मुटके गौरीचे रूप. पहिल्या दिवशी गहू, साळ, सरकी, ज्वारी, हरबरा, जवस, तूर आदी ७ धान्ये मिसळून दोन रंगविलेल्या कुंड्यांतून पेरतात. पहिल्या दिवशीची पूजा गव्हाच्या ओंब्यांनी होते. दुसऱ्या दिवशी ज्वारीचे कणीस गौरीच्या मुखवट्याजवळ ठेवतात. त्याला शंकर म्हणायचे. गाणी म्हणत विहिरीवर जाऊन पाणी आणून ते कुंड्यांतून शिंपडतात. महाराष्ट्रात गौर माहेरी येते त्या दिवशी गणगौरीचे थाटात विसर्जन होते. महाराष्ट्रात गणपती बरोबर गौर येते. 'गण' आणि 'गौरी' यांच्यातील अनुबंधाची झलक शोध घ्यायला लावणारी आहे.
 एकूण काय तर गौरीचा सण मातीच्या सुफलीकरणासाठी. शेण, राख, ही महत्त्वाची जंतुनाशक खते. म्हणूनच स्त्रियांना अनेक व्रतांत, विधीत शेण लागते. आंध्रात संक्रातीला कुमारिका शेणाचे गोळे करून त्याला हळदी कुंकू वाहतात. त्यावर फुल खोचतात. ते गोळे रांगोळीवर ठेवून त्याभोवती फेर धरून नाचतात. त्याला 'गोबम्मा' म्हणतात.
 भूमी, पाणी आणि सूर्य यांच्या अनुबंधातून भूमी सुजलाम सुफलाम होते. भूमी वर्षानुवर्षे फलते आहे फुलते आहे. तीही थकत असेल ना ? तिलाही विसावा हवाच ! तिचेही लाडकोड पुरवायला हवेत. पण भूमीचे सर्जनाचे कष्ट जाणणार कोण ? सर्जनाच्या कळा आकंठ अनुभवणारी स्त्रीच !

■ ■ ■

मनतरंग / ३०