पान:मनतरंग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू होते. मनाजोगा जोडीदार मिळविण्यासाठी तप करणारी उमा 'अपर्णा...' पानेही न खाता अन्नपाणी त्यागणारी तपस्विनी होते. शेवटी तृतीयेला जोडीदाराच्या मनातील 'माणूस' जागा होतो, तीच उमा-गौरी भाद्रपदातील सप्तमीला कृषिलक्ष्मीच्या रूपाने घराघरांतून येते. अष्टमीला सोळा भाज्या, पंचपक्वान्नाचे भोजन घेऊन तृप्त होते आणि नवमीला कृषिसमृद्धीचा आशीर्वाद देऊन परत जाते. वसंतातील गौर मात्र शंकरासह माहेरपणासाठी येते. चांगली महिनाभर विश्रांती घेते. अक्षयतृतीयेला कृषिसंपदेच्या तयारीसाठी रानात परतते.
 चैत्रगौरीच्या सणाला दोलोत्सव असे म्हणतात. तृतीयेला तिला शंकरासह झोक्यावर बसवतात आणि तिची पूजा करतात. सोयीनुसार, विशेषकरून मंगळवारी, शुक्रवारी घराघरातून चैत्रगौरीची देखणी सजावट करून हळदीकुंकू समारंभ करतात. उन्हाळ्याची तलखी जाणवू लागली असते. घराघरातून नवे माठ गार पाण्यासाठी येतात. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचा प्रसाद, कैरी घालून केलेली खमंग डाळ आणि गंधगार पन्हे असा असतो. कुमारिका आणि सुवासिनींची भिजवलेल्या हरबऱ्यांनी ओटी भरतात. हरबऱ्याची सुगी नुकतीच हाती आलेली असते. गुळाच्या ढेपाही येऊ लागलेल्या असतात. आणि कैऱ्यांचे झुमते डूल झुलवीत आंब्याची झाडेही सावली देत उभी असतात. खरीप आणि रब्बी अशा दोन सुग्या पिकवून थकलेली कृषिलक्ष्मी, चैत्रगौरीच्या रूपाने जणू विश्रांतीला माहेरी येते आणि ग्रीष्माचे भेदून टाकणारे अंगार अंगांगात साठवून घेण्यासाठी पुन्हा रानात जाते. सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. पृथ्वीला अग्निगर्भा म्हणतात. जमीन जेवढा अंगार झेलून घेईल तेवढी वर्षाऋतुतले पाणी साठविण्याची शक्ती तिच्यात येते आणि त्या पाण्याच्या बळावरच रब्बीची पिके - गहू, हरबरा, करडई, ज्वारी यांची शेते बहरून येतात.
 चैत्रात, कोकणात 'गौरीचे गाणे' म्हणण्याची प्रथा आहे. चैत्रात अंगणात एकेक कोपरा सारवून त्यावर नवनव्या रांगोळ्या घालण्याची प्रथाही कोकणात आहे. त्याला चैत्रांगण म्हणतात. चैत्रगौर केवळ महाराष्ट्रात नाही तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकातही विविध रूपाने मांडली जाते. एकूणच उत्तर प्रदेशात 'गणगौर' सामूहिक रीतीने साजरी करतात. उत्तरेत पौर्णिमेच्या दिवशी नवा महिना सुरू होतो. महाराष्ट्रात फाल्गुन कृष्णप्रतिपदेस गौर बसते. उत्तरेत होळीच्या राखेचे १६ मुटके करतात व शेणाचे १६ ठिपके करतात. भिंतीला १६

गौराई आमची बाळाई.... / २९