पान:मनतरंग.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अन्न वस्त्र आणि निवारा देणारी अवनी म्हणजे पृथ्वी. अवनी आणि स्त्री यांचे नाते तनामनाचे आहे. आमचे सण, उत्सव, व्रते ही देखील या नात्यावर बेतली गेली आहेत. वसंताची चाहूल लागते ती धरणीतून उगवणाऱ्या झाडांनाच. हेमंतात पानझडीने शुष्क झालेल्या उजाड फांद्यांमधून वसंतऋतूची चाहूल फेब्रुवारीच्या अध्यामध्यात झुळकून जाते नि अंजिरी रंगाची कोवळी मखमल फांद्यांच्या अंगांगातून उगवू लागते, लवलवू लागते. पाहतापाहता कळ्याचे घनदाट धुमारे पळस, गुलमोहर, शंखासुर यासारख्या वृक्षांवर झळकू लागतात. एकीकडे दिवसा उन्हाचा ताप वाढत जातो पण श्यामल संध्याकाळी झुळझुळणाऱ्या झाडावरून मंदपणे वाहत येणारे, मनाला नाजूक धक्के देणारे सुगंधी वारे तरुणाईचा तजेला देऊन सांगतात की, वसंतऋतू अंगणात येऊन उभा राहिलाय. त्याच्या स्वागतासाठी सज्ज रहा.
 या वसंताचे स्वागत म्हणजे भूमीच्या वसंत ऋतूचे स्वागत. ते मनोभावे करण्याची परंपरा स्त्रीनेच निर्माण केली. स्त्रियांच्या व्रतात तृतीयेला विशिष्ट मान आहे. हरितालिका व्रत भाद्रपद तृतीयेला असते तर सहा महिन्यांनी येणारी चैत्रगौरही तृतीयलाच विराजमान होते. भाद्रपदात हरितवस्त्रांकिता गौरीचे स्वागत तृतीयेपासून

मनतरंग / २८