पान:मनतरंग.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनिष्ट रूढी आणि परंपरांमुळे निस्तेज झाले आहे. आई ही 'एक बाई' आणि बाईचे स्थान समाजात खालच्या दर्जाचे. तिला शिक्षणाचा अधिकार नाही. तिने प्रश्न विचारायचे नाहीत. तिचे कर्तृत्व स्वयंपाकघर आणि माजघरात. संधी मिळाली तरच तिच्यातली ऊर्जा प्रगट होई. ज्या ऊर्जेमुळे सभोवतालचे जग चकित होई. अर्थात ही संधी लाखात एखादीलाच लाभे. त्यातूनच मग महाराष्ट्राचे भाग्य घडवणारी जिजाई, येसूबाई, अहिल्यादेवी, झाशीची लक्ष्मीबाई सारख्या वीरांगना प्रकाशात आल्या. समाजातल्या सर्वसामान्य घरातील प्रत्येक आईत ऊर्जा आहे. पण ती प्रकट करण्याची संधी तिला मिळते का ? मिळत नसल्यास का मिळत नाही ? आईचा स्त्री म्हणून शिक्षणाचा अधिकारच धर्माने, समाजातील रूढी पंरपरांनी नाकारला. तिचा धर्म विद्या, कला यांपासून तोडला गेला. पूजापाठ करणे, पंरपरेने शिकवलेल्या आरत्या, देवाची गाणी, क्वचित भजने म्हणणे, देवादिकांच्या कथा मनोभावे समोर येतील तशा ऐकणे, पती व कुटुंबासाठी कष्टणे यांत ती बांधली गेली. पुराणातील गार्गी, मैत्रेयी, अनूसया, विष्पला यांच्या कथा सामान्य घरातील स्त्रीच्या नाहीत. ज्यांना वर्ण, घराणे, संपत्ती यांच्या मोठेपणामुळे संधी मिळाली अशांच्या आहेत. खूपदा सांगितले जाते की 'स्त्री' ची मुंज होत असे. होत असेलही. ज्या गर्भातून प्रजानिर्मिती व्हायची तो गर्भाशय पवित्र करण्याचा उद्देशही त्यामागे असू शकतो. एकीकडे म्हणायचे की, "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति !" तर दुसरीकडे स्त्री कोणाची आई आहे, कोणते बीज तिने उबवले यावर तिचा दर्जा वा मोठेपण ठरवायचे ! तिचे मातृत्व हा तिचा अधिकार राहिला नाही. तिच्या निर्णयाला किंमत शून्य आणि म्हणूनच अशी लाखो चिमणी...कोवळी फुले काट्याकचऱ्यात, रस्त्या-उकिरड्यावर फेकली जातात. पण प्रेमाने उचंबळून येणारा पान्हा उरात कोंडून, थरथरत्या हाताने काही दिवसांपूर्वी जगात आलेला जीव रस्त्यावर टाकताना तिच्यातल्या 'आई'ला झालेल्या यातनांचे वळ कोणाच्या मनावर उमटतात ?
 अशी ही प्रत्येक आई संस्काराचे पहिले आणि महत्त्वाचे माध्यम. तीच जर अडाणी, निरक्षर, दुर्बल आणि अंधश्रद्धांनी घेरलेली असेल तर तिच्याकडून कोणते संस्कार मुलांकडे जाणार ? आमच्यावर जातीयतेचा, धर्मांधतेचा पहिला संस्कार कळत-नकळत आईच करते. 'तुझ्या मित्राला पाण्यापर्यंत आणू नको, हलक्या जातीचा आहे ना तो ? एवढंही कळत नाही ? आमक्या धर्माच्या

मनतरंग / २६