पान:मनतरंग.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सायनाचार्य 'वृष्ट्युदकानां गर्भषदुत्पादकम्' असा लावतात. सूर्य स्वनिष्ठ उदकातून सृष्टीला फळवितो, तिला सुफलित करतो अशी प्राचीन समजूत आहे.
 जमिनीवरचे पाणी सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून वाफ घेऊन वर जाते. ते पाणी सूर्यगोलकात गेल्यावर त्यात अमृताची शक्ती येते. आषाढ, श्रावण, भाद्रपदात ते अमृतमिश्रित पाणी भूमीवर बरसते आणि त्यातून हरितलक्ष्मीचे सौंदर्य बहरते आणि म्हणूनच केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे शक, कुशण, इराण, रोम येथील संस्कृती सूर्यपूजक होत्या. पेरू देशात आजही अनेक सूर्यमंदिरे सापडतात. सिरिया, इजिप्त, जपान या देशात सूर्यपूजा महत्त्वाची होती.
 अरुणाचल राज्याच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात तगीन नावाची जनजाती राहते. ते सूर्याला आई मानतात. या आईला 'दोनी' म्हणतात. रेड इंडियन लोक सूर्यपूजक होते. ते पहिली शिकार सूर्यास अर्पण करीत. महाभारतात सूर्यपूजा आहे. युधिष्ठिर सूर्यपूजक होता. कनोजचा राजा हर्षवर्धन हा बौद्ध असला तरीही महेश्वर, गौरी आणि सूर्य यांची उपासना करी. या तीनही देवता अन्नसमृद्धीशी जोडलेल्या आहेत.

 संक्रान्त, रथसप्तमी, होळी, चैत्र पाडवा, अक्षयतृतीया ही व्रते सूर्यपूजेशी निगडित आहेत. चैत्रतृतीयेला माहेरपणाला आलेली गौराई अक्षयतृतीयेपर्यंत निवांतपणे माहेरी राहते. या काळात कैऱ्या, काकड्या, टरबूज, खरबूज यांची रेलचेल असते. उन्हे प्रखर होत जातात. यादिवशी गौरीची पाठवणी करताना गरजू व्यक्तीला माठ, टरबूज देतात. थंडगार पन्हं पिण्यास देतात. गौराई घरालाच नव्हे तर शेतभाताला अक्षय समृद्धीचा आशीर्वाद देऊन रानात परतते. होळीच्या राखेत दोडकी, पडवळ, गिलकी, तोंडली, भोपळा आदी वेलीभाज्यांच्या बिया मिसळून मडक्यात घालून ठेवतात. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर घरालगत आळी तयार करून त्यात त्या रोवतात. या मुहूर्तावर रोवलेल्या वेलींना उदंड फळे येतात, अशी शेतकरी-स्त्रियांची श्रद्धा आहे. गोवऱ्यांची राख, बियाणे निर्जंतुक करते हे शास्त्रीय सत्य आहे. अक्षयतृतीयेला महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी पेरणीचा मुहूर्त करतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. खानदेशात या मुहूर्तावर मुली गौर मांडून कानबाई या खानदेशातील अत्यंत पूजनीय अशा देवीची गाणी टिपऱ्या खेळत गातात. या मुहूर्तावर लग्न लावण्याची प्रथा भारतभर प्रचलित आहे. कर्नाटकात या दिवशी कृषिसंबंधीचे भविष्य जाणून घेण्याची प्रथा आहे.

सूर्य आणि भूमीचे अक्षय माने / २३