पान:मनतरंग.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  गेली हजारो वर्षे आम्ही भारतीय स्त्रिया वटसावित्री, मंगळागौर, हरितालिका यासारखी व्रते, पति परमेश्वराच्या निरोगी आणि सुदीर्घ आयुष्याची कामना परिपूर्ण व्हावी यासाठी अत्यंत निष्ठेने... श्रद्धेने करीत आहोत. ती व्रते आता पाऊस आणि वादळी वाऱ्यांसोबत अगदी अंगणात येऊन उभी आहेत. एकविसाव्या शतकात आम्हां स्त्रियांच्या व्रतवैकल्यांकडे आम्ही सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि चिकित्सक भूमिकेतून पाहणार की नाही ?
 'स्त्री' ने शेतीचा, कंदमुळे... फळे... शाकभाज्या यांचा अन्न शिजविण्याचा शोध लावला हे सत्य जगमान्य आहे. मुदगलानी या स्त्रीला नांगरण्याची कला माहिती होती. बैलाऐवजी स्वत:ला नांगराला जोडून ती जमीन भुसभुशीत करीत असे. झाडे सावली देतात. फळे देतात. पानांनाही चव असते, त्यांच्या फांद्यांचा लाकूडफाटा अन्न शिजविण्यासाठी उपयोगी पडतो. तर फांद्यांना, पानांना एकमेकांत गुंतवून सुरेखशी झोपडी बांधता येते.

 आपल्याला कुशीत घेऊन ऊन, थंडी, पाऊस, विंचू-काटा यांपासून रक्षण करणारी झोपडी. ही झाडे मुळाशी पाणी धरून ठेवतात याचेही स्त्रियांना भान होते. भारतातील लोककथातून झाडाला पाणी घालून त्यांच्यावर चढलेली

मनतरंग /१६