पान:मनतरंग.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. म्हणूनच त्याने स्त्रीच्या या शरीरधर्माचा उपहास केला नाही.
 पण निसर्गाशी संवाद साधण्याऐवजी निसर्गाला मी एका डबीत कोंडू शकतो असा गर्व करणाऱ्यांनी 'धर्म' या समाजाची योग्य मांडणी करणाऱ्या व्यवस्थेला आपल्या मुठीत ठेवले.
 धर्म हा माणसांसाठी, त्यांच्यातील कृतिशीलतेला 'ऊर्जा' देणारा न राहता काहींच्या 'अर्था' शी बांधला गेला आणि त्यातील 'विश्वात्मक देव' ही हरवून गेला. परमेश्वराची सर्वात्मकता संपली. त्यालाही विटाळ होऊ लागला.
 दक्षिणेतील एका देवस्थानाला भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. गाभाऱ्यात प्रवेश करताना पुरुषांनी पँट घालण्याऐवजी लुंगी व धोतर घालून यावे अशी सूचना होती. बरोबरच्या कन्यांनी घातलेल्या पंजाबी ड्रेसबद्दलही नाराजी व्यक्त केली गेली. बरोबरची मंडळी बाहेर थांबली. आम्ही तिघी साडीवाल्या आत जाऊन आलो. शेकडो वर्षांपूर्वी, काळ्याकभिन्न पाषाणातून अगदी नेमकेपणानी कोरलेली विलक्षण देखणी मूर्ती.
 दगडाचे रेशमीपण वर्षानुवर्षे सळसळत राहणारे. समोर समईच्या लवलवत्या वाती. त्या प्रकाशात परमेश्वराच्या… त्या पाथरवटाने घडवलेल्या माणसांच्या मनातल्या परमेश्वराच्या डोळ्यात नजर घालून पाहण्याचा प्रयत्न मी केला.
 तिथे तर होती नीरव शांतता. कसलीही अपेक्षा न करणारे, फक्त मंदपणे तृप्त हास्य करणारे डोळे. ही नीरव शांतता… ते तृप्त हास्य पँटवाल्यांना दिसलं नसतं ? की ती तृप्ती आणि नीरवता पँटमुळे डहुळली असती?

 स्त्रियांनी कार्तिकस्वामीच्या देवळात जाऊ नये अशी रीत. पण आम्ही ती कधीच पाळली नाही आणि आम्ही सुरक्षित आहोत. नि कार्तिकस्वामीही सुरक्षित आहेत. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर स्त्रियांनी चढू नये हा नियम करणारी माणसेच. स्वतः शनिमहाराज तर सांगण्यासाठी आलेले नाहीत. परंतु स्त्री ही दुय्यम आहे, ती अपवित्र आहे, रक्तमांसाच्या घाणीने लडबडलेली आहे. ती सभ्य पुरुषालाही स्खलित करते… इत्यादी तत्त्वज्ञान सांगणारीही माणसेच. दुर्दैव हे की समाजाने वा धर्माने स्त्रीतील 'माणूसपण' कधी समजून घेतले नाही. तिला मन आहे. मनात निर्माण होणारे विविध भाव आहेत. ते व्यक्त करण्याची उर्मी स्त्रीच्या हृदयात आहे. भावना व्यक्त करणारे अत्यंत सक्षम असे स्वरयंत्र… वाचा

मनतरंग /१४