पान:मनतरंग.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जे आजही त्यांना कष्ट, संकटांना सामोरे जाण्याचे बळ देते आहे…?

 ज्ञानोबा तर चारही वर्णांपेक्षा कनिष्ठ अशा पाचव्या वर्णाचा. त्याला तरी 'ज्ञाना'चा प्रचंड मद असणाऱ्यांनी ज्ञानाचा अधिकार दिला का ? आज भलेही समाजाला ज्ञानेश्वरांचे 'कुलकर्णी'पण आठवत असेल. पण खरा बंडखोर तोच ! ज्ञानाचे लेणे या भावंडांना समाजात 'अधिकार' देणारे ठरावे यासाठी ज्ञानदान करुन, मातापित्यांनी आपले श्वास भागीरथीच्या… गोदावरीच्या पाण्यात मिसळले. ही भावंडे स्मशानात वाढली. सामाजिक बहिष्काराची आग ज्यांनी पचवली त्यांनाच सामन्यांची आत्मव्यथा आकळली !! त्यातूनच मातीशी नाते सांगणाऱ्या, माउलीच्या निरामय मायेची प्रगाढ खोली जाणवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया 'ज्ञानेश्वर माउली'ने रचला. त्यानंतर खऱ्या अर्थाने 'माउली'पण जगले निजागवले ते साने गुरुजींनीच. विठोबा दक्षिणेतून आला की उत्तरेतून? तो विष्णूचे रूप की त्यात शंकराचाही अंश ? वगैरे… वगैरे प्रश्नांचा वेध अभ्यासक घेत आहेत. आणि घ्यावाही. परंतु कशाचीही अपेक्षा न करणारा आणि म्हणूनच नवससायासांचे अवडंबर न माजवणारा हा काळाभोर 'विठोबा' शेकडो वर्षे कष्टकरी सामन्यांची… साध्यासुध्या महिलांची 'आधारशिळा' बनून राहिला आहे, आणि पुढेही बनून राहील…!

■ ■ ■

मनतरंग /१२