पान:मनतरंग.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालणाऱ्या या 'वारी' मागे ? कोणता विश्वास असेल ? कोणती जादू असेल ? या वारीतली एक वारकरी जनी सांगून गेली, 'विठूमाझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ।' लेकुरवाळ्या विठूचे 'लेकुरवाळेपण' आषाढाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून अक्षरशः रांगत असते. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला...शेतात कष्ट करणाऱ्या, गाई-गुरांमागे हिंडणाऱ्या श्रमिकाला, घरीदारी मानसिक, शारीरिक दडपणाखाली पिचणाऱ्या स्त्रीला नीरव शांतीची 'स्वप्नभूमी' देणारा 'जादूगार' हा विठू असेल का? धर्माने माणसामाणसांतील तेढ जातीयतेच्या माध्यमातून सतत जळती ठेवली.

"उस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥"

असे विचारणारा...शेवटच्या पायरीचा का होईना, (अर्थात ती पायरी पहिल्यांदाच लागते) ज्याला मान मिळाला तो चोखोबा, त्याचा काळ आणि आजचा काळ यात मानसिकदृष्ट्या आम्ही चारदोन पावलं तरी पुढे गेलो की नाही ?... त्र्यंबक सपकाळेंना आगीनगाडीत भेटलेल्या मित्रासोबत त्यांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. एकमेकांची शिदोरी खाताना, देवाणघेवाण झाली. पण स्टेशनात उतरल्यावर त्र्यंबक सपकाळेंनी भेटलेल्या दुसऱ्या मित्राला 'जयभीम' घातला नि आगगाडीत भेटलेल्या मित्राला अचानकपणे झडझडून वांती झाली. सपकाळेंना कळेना, काय झाले. विचारले तर उत्तर मिळाले,

'गाडी लागनी मले गाडी लागनी'

चारशे वर्षांपूर्वी वारकरी मंदिरावर कळस चढविणाऱ्या तुकयाने काहीशा उद्वेगाने म्हटले -

'बरे झाले कुणबी झालो ।
ना तरी असतो दंभे मेलो ॥

तत्कालीन महार-चांभार, सोनार, शिंपी, माळी, कुंभार, लोहार अशांना तसेच दासी जनी, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीची मुलगी कान्होपात्रा अशा सर्वसामान्य कष्टकरी समाजाला असे कोणते भावनिक, नैतिक बळ या विठोबाने दिले असेल?

लेकुरवाळा काळा विठू... /११