पान:मनतरंग.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  वरून आभाळ कोसळतंय, रस्त्याच्या कडेने पिवळी रानफुलं रुमझुमत्या धारांत तरारून उठली आहेत. त्या पावसात आकंठ भिजत हजारो माणसांची रांग धुंदीत पुढे पुढे पळते आहे. काहीजणींच्या माथ्यावर चिमुकले तुळशीवृंदावन तर काहींच्या माथ्यावर कळशी. चारदोन जणांनी माथ्यावरच्या पटक्याने गळ्यातला मृदंग नीटसपणे झाकून घेतलाय. अनेकांच्या गळ्यात पितळी झांजांची जोडी. काहींच्या हातात चिपळ्या तर काहींनी गळ्यातली एकतारी उपरण्याने झाकून घेतलीय. हा थवा...जत्था एका लयीत पुढे पुढे धावतोय. आणि हे दृश्य महाराष्ट्राच्या अवघ्या रस्त्यांवर सारखेच. जरादेखील फरक नाही, इथे मात्र तीस टक्के राखीवची अट नाही. काही जथ्यात तर साठ टक्क्याहून अधिक भरती स्त्रियांचीच. वयाचेही बंधन नाही. अगदी दहा वर्षांच्या लेकरापासून ते तरुण... प्रौढ...वयस्क...थेट ऐंशीचा पल्ला गाठलेले स्त्री-पुरुष एका लयीत, एका धुंदीत पंढरीच्या वाटेने धावताहेत.
 एक इंग्रजी म्हण आहे. तिचे मराठीतील भाषांतर असे - श्रद्धेने जगी चालतो, न बहुधा दृष्टीमुळे मानव...

 अशी कोणती श्रद्धा असेल, गेल्या हजारो वर्षांपासून अव्याहतपणे

मनतरंग /१०